म्हात्रे नगरच्या नाल्यातील अरुंद पाइप काढून मोठा बोगदा बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST2021-05-26T04:40:14+5:302021-05-26T04:40:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : म्हात्रे नगर येथे नाल्यातून वाहून येणारे सांडपाणी कोपर येथे रेल्वे रुळांजवळ वाहत जाते. तेथे ...

म्हात्रे नगरच्या नाल्यातील अरुंद पाइप काढून मोठा बोगदा बांधा
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : म्हात्रे नगर येथे नाल्यातून वाहून येणारे सांडपाणी कोपर येथे रेल्वे रुळांजवळ वाहत जाते. तेथे नाल्याच्या नव्याने बांधकाम करताना अरुंद पाइप टाकण्यात आला आहे. त्यामुळे सांडपाणी बाहेर येऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांनी या नाल्याची पाहणी करून अरुंद पाइप काढून पाणी जाण्यासाठी मोठा बोगदा बांधा अथवा मोठे पाइप टाकण्याच्या सूचना केडीएमसीच्या मलनिस्सारण विभागाच्या उपअभियंत्यांना दिल्या.
या संदर्भात माजी नगरसेवक मुकुंद (विशू) पेडणेकर यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये रविवारी ‘पावसाळ्यात म्हात्रे नगरमध्ये तुंबणार पाणी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत चव्हाण यांनी सोमवारी त्या नाल्याची पाहणी केली. यावेळी वस्तुस्थिती बघून त्यांनी मनपा आणि रेल्वेच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.
पावसाळ्यात साईनाथ नगर झोपडपट्टीतील घरे पाण्याखाली जाऊ नयेत, यासाठी तातडीने आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. दोन्ही यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून अरुंद पाइपच्या जागी मोठे पाइप टाकून अथवा मोठा बोगदा तयार करून पाण्याचा निचरा करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. तसेच निर्णयाची माहिती लेखी स्वरूपात पेडणेकर यांना द्यावी, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
त्यावर केडीएमसीचे मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता शिरीष नाकवे, रेल्वेच्या डीएफसीसी प्रकल्पाचे अधिकारी विकास कुमार यांनी आठवडभरात निर्णय घेऊन अरुंद पाइप काढले जातील, असे आश्वासन दिले. या पाहणीवेळी भाजपचे अमित कासार, अमित टेमकर, संजीव बीडवाडकर आदी उपस्थित होते.
--------------