टाकीपठार आरोग्य केंद्रात परिचारिकेकडून उपचार

By Admin | Updated: November 11, 2016 02:57 IST2016-11-11T02:57:03+5:302016-11-11T02:57:03+5:30

शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या टाकीपठार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे

Remedies from the nurse in the Tank Stones Health Center | टाकीपठार आरोग्य केंद्रात परिचारिकेकडून उपचार

टाकीपठार आरोग्य केंद्रात परिचारिकेकडून उपचार

किन्हवली : शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या टाकीपठार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. रात्रीच्या वेळी येथे एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाही, शिवाय येथे एक महिला परिचारिकाच उपचार करत असल्याने आदिवासी रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे.
सकाळी ९ ते ६ या वेळेत एक व रात्री एक अशा २४ तासांसाठी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. तरी सकाळी ११ नंतर येणे आणि संध्याकाळी ४ वाजण्यापूर्वीच निघून जाणे तसेच रात्री येथे एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसणे, ही या दवाखान्यासाठी नित्याची बाब बनली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र पवार व डॉ. महेश जाधव हे रोजच केवळ एका परिचारिकेवर दवाखान्याची जबाबदारी सोपवून निघून जात असल्याची माहिती कर्मचारी देतात. त्यामुळे रात्री तातडीचे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची अडचण होते. शिवाय, त्यांना रात्रीअपरात्री १५ किमी अंतरावर असणाऱ्या किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घ्यावी लागते. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे बहुसंख्य रु ग्ण किन्हवलीला जाणे पसंत करतात. परिणामी, किन्हवली आरोग्य केंद्रावर अधिकचा भार पडत असल्याची माहिती मिळाली.
विशेष म्हणजे, या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाली असून नवे वैद्यकीय अधिकारी हजरच होत नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणाबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश नगरे यांच्याकडे विचारणा केली असता मी चौकशी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत पाठपुरावा करतो, असे उत्तर दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना असतानाही खुलेआम हा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप बिरसा मुंडा वनवासी संघटनेचे उपाध्यक्ष मंगल निरगुडा यांनी केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Remedies from the nurse in the Tank Stones Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.