स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ मध्ये देशात ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी

By अजित मांडके | Published: January 13, 2024 04:27 PM2024-01-13T16:27:48+5:302024-01-13T16:29:52+5:30

४४ व्या स्थानावरून २४व्या स्थानावर झेप.

Remarkable performance of Thane in the country in Swachh Survekshan 2023 | स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ मध्ये देशात ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी

स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ मध्ये देशात ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी

अजित मांडके , ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेला दिलेले सर्वोच्च प्राधान्य, शहराची एकूण स्वच्छता आणि शौचालयांची स्वच्छता हे उद्दिष्ट ठेवून प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांची परिणिती म्हणून स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ मध्ये ठाणे शहराने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. २०२२मध्ये सहभागी सर्व शहरांत गुणानुक्रमानुसार ठाणे शहराचा ४४ वा क्रमांक आला होता. त्यावरून झेप घेत यंदा ठाणे शहराने २४ वे स्थान पटकावले आहे.

महानगरपालिकेने वर्षभर स्वच्छतेसाठी निरनिराळे उपक्रम हाती घेतले. दररोज कचरा टाकला जिथे कचरा टाकला जात असे अशा १५०हून अधिक जागांवरील कचरा टाकणे पूर्णपणे थांबविण्यात आले. तसेच, घरोघरी कचरा संकलन करण्याची क्षमता वाढवून प्रत्येक घरी कचरा संकलन गाडी गेलीच पाहिजे, या सूत्रानुसार कचऱ्याचे संकलन सुरू करण्यात आले. रस्ते सफाईच्या कामांना सकाळी सहा वाजता सुरुवात करून आठ वाजेपर्यंत मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण करणे, स्वच्छता कर्मचारी पूर्णवेश कर्तव्यावर हजर असणे, बाजारपेठा आणि दुकानांच्या परिसरात सायंकाळी आणि रात्री साफसफाई करणे, यांत्रिक सफाईला सुरुवात अशा सर्वांगीण प्रयत्नांचे फलस्वरुप म्हणून स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये ठाणे शहराची कामगिरी मोठ्या प्रमाणावर सुधारलेली दिसते आहे. 

स्वच्छता सर्वेक्षण-२०२३ मध्ये देशभरातील ४४६ हून अधिक शहरात ठाण्याला २४वा क्रमांक मिळाला आहे. गेल्या वर्षी ४२७ शहरात ठाणे शहराला ४४ वा क्रमांक मिळाला होता. एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात ठाण्याचे स्थान २४वे आहे. तर, दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत ठाण्याला १४ वे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी ठाण्याचा १३ वा क्रमांक होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता आणि सुशोभीकरण मोहिमेत, ठाणे शहर स्वच्छ बनवणे हा एकच ध्यास घेऊन गेले वर्षभर स्वच्छता कर्मचारी परिश्रम घेत आहेत. त्यामुळेच ठाणे शहराच्या एकंदर गुणानुक्रमात मोठ्या प्रमाणावर वृद्धी झाली आहे. ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र, ठाणे शहराची क्षमता आणि नागरिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन ठाणे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या सर्वोच्च पातळीवर नेण्याचे उद्दिष्ट साध्य करणे हे पुढील ध्येय आहे, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यासंदर्भात स्पष्ट केले. 

सफाई कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच ठाणे शहर बदलते आहे, स्वच्छ होते आहे. याची जाणीव ठेवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून अधिक जबाबदारीने वागू व पुढील सर्वेक्षणात देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरात येण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही बांगर यांनी दिली आहे.

ठाणे शहराला वॉटर प्लस शहराचा बहुमान :

त्याचवेळी, ओडीएफ (हागणदारीमुक्त) श्रेणीतील सर्वोच्च असा 'वॉटर प्लस' शहरात ठाण्याला प्रथमच मिळू शकला आहे. पाण्याचे नियोजन, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्यावर प्रक्रिया या मुद्द्यांवर 'वॉटर प्लस' शहराचे मूल्यांकन केले जाते. 

हागणदारी मुक्तता, मलनिस्सारण प्रकल्पांची कार्यक्षमता या बाबत ठाणे महापालिका क्षेत्रातील कामगिरी चांगली असल्याने शहराला प्रथम 'ओडीएफ ट्रीपल प्लस' हा बहुमान मिळाला होता. आता त्यापुढील 'वॉटर प्लस' मानांकन मिळाले आहे. 'ओडीएफ ट्रीपल प्लस' प्रमाणपत्रासोबतच, मलजलशुद्धीकरण प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या किमान २० टक्के सांडपाण्याचा पुनर्वापर करणे, तसेच, मलजलशुद्धीकरण प्रकल्प चालवण्यासाठी व त्याची देखभाल करण्यासाठी लागणारा खर्च हा स्वच्छता करातून पूर्ण करणे या दोन मुख्य निकषांची पूर्तता करावी लागते.

Web Title: Remarkable performance of Thane in the country in Swachh Survekshan 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.