रेमडेसिविर, ऑक्सिजनच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:06 IST2021-05-05T05:06:27+5:302021-05-05T05:06:27+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोविड रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो की नाही, याची पाहणी ...

रेमडेसिविर, ऑक्सिजनच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पथके
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोविड रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो की नाही, याची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्तांनी दोन पथके नेमली आहेत. या पथकांकडून विविध कोविड रुग्णालयांत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे.
मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, मनपा हद्दीतील खासगी रुग्णालयांनी रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी नोंदविल्यास त्यांना जिल्हा नियंत्रण समितीकडून ती उपलब्ध करून दिली जात आहेत. तसेच ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा केला जात आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी मनपाचे डॉक्टर आणि टास्क फोर्समधील डॉक्टर यांच्या पथकांमध्ये समावेश आहे. एक पथक डोंबिवली, तर एक पथक कल्याणमधील रुग्णालयांवर लक्ष ठेवणार आहे. ‘रेमडेसिविर’ची गरज नसताना त्याची मागणी केली जात आहे का, तसेच संबंधित रुग्णालाच मागविलेले हे इंजेक्शन दिले जात आहे का, तसेच गरज नसतानाही रुग्णाला ऑक्सिजनचा बेड दिला जात आहे का, आदी बाबींची ही पथके पाहणी करणार आहेत. या पथकांनी अनेक रुग्णालयांना भेटी देऊन त्याचा अहवाल प्रशासनास दिला आहे.
रुग्णसंख्या घटल्याने बेड उपलब्ध
सूर्यवंशी पुढे म्हणाले, मनपा हद्दीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के आहे. रुग्णसंख्या घटत मनपा हद्दीत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत आहेत. तशी काही अडचण निर्माण होत नाही. मागच्या आठवडाभरात अनेक रुग्ण प्रकृती गंभीर झाल्यावर उपचारासाठी दाखल झाल्याने मृत्यू जास्त झाल्याचे दिसून येत होते. प्रत्यक्षात मृत्युदर हा दोन टक्क्यांच्या आतच आहे.
मुलांसाठी ५० बेडची सुविधा
डोंबिवली विभा कंपनीच्या जागेत मनपाकडून ५८० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विभा कंपनीच्या जागेतील कोविड रुग्णालयात ५० बेड हे लहान मुलांच्या उपचारासाठी असतील, असे सूर्यवंशी म्हणाले.
---------------