उल्हासनगरातील कोरोना रूग्णांना दिलासा, महापालिका खरेदी करणार कोरोनावरील औषध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 16:57 IST2020-07-14T16:57:02+5:302020-07-14T16:57:49+5:30
उल्हासनगरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णाची संख्या ४५०० पेक्षा जास्त झाली. तसेच मृत्यू दरात वाढ झाली

उल्हासनगरातील कोरोना रूग्णांना दिलासा, महापालिका खरेदी करणार कोरोनावरील औषध
सदानंद नाईक
उल्हासनगर : अत्यवस्थ कोरोना रुग्णासाठी गुणकारी ठरलेल्या रेमडेसिवीर व टोसिलिझुमॅब औषध खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. निविदा कडून दोन्ही औषधांच्या ५०० बाटल्या संच खरेदीची प्रक्रिया सुरू केल्याची प्रतिक्रिया महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास मोहणाळकरं यांनी दिली.
उल्हासनगरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णाची संख्या ४५०० पेक्षा जास्त झाली. तसेच मृत्यू दरात वाढ झाली. कोरोना अत्यवस्थ रूग्णांना गुणकारी ठरलेले रेमडेसिवीर व टोसिलिझुमॅब औषधाचा तुटवडा असून दोन्ही औषधांचा काळाबाजार होत आहे. तसेच दामदुप्पट किंमतीला औषध खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली. औषध आणण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक मुंबई व ठाणे येथे जात आहेत. मात्र या दोन्ही औषधांचा वितरक घाटकोपर येथे असून वितरकांच्या मेडिकल समोर लांबच लांब लागत असल्याचे रूग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. औषधाच्या तुटावड्या बाबतच्या असंख्य तक्रारी महापालिका आयुक्ता पर्यंत गेल्या. अखेर महापालिकेने दोन्ही औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेवून ५०० बाटल्या संच साठी निविदा कडून खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.
मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, व्यापारी संघटना, सामाजिक संघटनेसह राजकीय नेते आदींनी कोरोना औषध खरेदी करून सवलतीच्या किमतीत नागरिकांना देण्याची मागणी महापालिका आयुक्त यांच्याकडे यापूर्वी केली होती. महापालिकेच्या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत असताना, दुसरीकडे कोरोना पोझीटीव्ह रूग्णांची संख्या वाढल्याने, त्यांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याचे चित्र शहरात आहे. याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करीत असून महापालिका आरोग्य विभागाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. उपचारा विना अनेक रुग्णांनी जीव गमावल्याचा आरोप होत असून अद्यावत कोविड रुग्णालय उभारण्याची मागणी सर्वस्तरातून महापालिकेकडे होत आहे.
चौकट
महापालिका कोरोना चाचणी केंद्र उभारणार
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी कोरोना चाचणी केंद्र उघडण्याचे संकेत दिले. कोरोना चाचणी केंद्र शहरात सुरु झाल्यानंतर काही तासात कोरोना अहवाल येवून रुग्णावर त्वरित उपचार होणार आहे.