बदलत्या काळात नाते मात्र तसेच - सुप्रिया पेठे
By Admin | Updated: October 13, 2016 03:43 IST2016-10-13T03:43:03+5:302016-10-13T03:43:03+5:30
पूर्वीच्या नातवंडांच्या शंका कुशंकाचे निरसन करायला हक्काचे आजी आजोबा असायचे आता मात्र त्यांची बौद्धिक भूक भागवण्याचे काम गुगल करीत

बदलत्या काळात नाते मात्र तसेच - सुप्रिया पेठे
ठाणे : पूर्वीच्या नातवंडांच्या शंका कुशंकाचे निरसन करायला हक्काचे आजी आजोबा असायचे आता मात्र त्यांची बौद्धिक भूक भागवण्याचे काम गुगल करीत आहे. परंतु, या बदलत्या काळात नाते मात्र आजही तसेच आहे असे मत प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सुप्रिया पेठे यांनी व्यक्त केले.
अत्रे कट्ट्यावर ‘आजी - आजोबा कालचे आणि आजचे’ व ‘माझी निवृत्ती’ या दोन विषयांवर आयोजित केलेली वक्तृत्व स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. १५ ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पेठे यांनी त्यांची आजी, त्यांची आई आणि आता मी आजी असा तीन पिढ्यांतील आजी आजोबांवर खूपच मुद्देसूद विचार मांडले. माझी आजी गावाला राहत असल्याने तिथे गेल्यावरच तिची भेट होत असे. पण वयात आल्यावर तिने मला रितीरिवाजांपासून ते अगदी पंगत कशी वाढावी याचे धडे दिले. त्याकाळी क्लासेसचे प्रस्थ नव्हते. त्यामुळे माझी आई माझ्या मुलांना जेवूखावू घालायची, त्यांचे कौतुक करायची तर त्यांना गोष्टीही सांगायची. मी आजी झाले आहे. काळ खूप बदलला आहे. आता माझे काम म्हणजे त्यांच्या क्लासच्या वेळा संभाळणे. दोन क्लासच्यामध्ये नीट खाताहेत ना ते पहाणे.
मुलांच्या वाढत्या क्षमता लक्षात घेऊन त्यांच्या या पालकांनी आपल्या वागण्यात बदल करावा असे पेठे यांनी सुचित केले. त्यांची महापालक ही संकल्पना परिक्षकांना भावली. मोबाईलचे आक्रमण अजिबात आवडले नसल्याची स्पष्टोक्ती तृतीय क्रमांकाच्या पद्मा खांबेटे यांनी केली. परंतु, हे त्यांचे आयुष्य असल्याने आपली ढवळाढवळ नको असेही त्या म्हणाल्या. उत्तेजनार्थ म्हणून बळवंत कर्वे व सुलभा आरोसकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी निवृत्ती ही वृत्ती आहे व्याधी नाही हे लक्षात घेऊन ती कशी सार्थकी लावावी हे सांगितले.