ठाण्यातील मालमत्ताधारकांकडून ४४६ कोटी ७४ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:17 IST2019-03-09T23:17:15+5:302019-03-09T23:17:24+5:30
आगामी काळात महापालिकेचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होणार असल्याने महापालिकेने तीन महिने आधीपासूनच मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली होती.

ठाण्यातील मालमत्ताधारकांकडून ४४६ कोटी ७४ लाखांची वसुली
ठाणे : आगामी काळात महापालिकेचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होणार असल्याने महापालिकेने तीन महिने आधीपासूनच मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार ७ मार्चपर्यंत ४ लाख ७५ हजार ९१५ मालमत्ताधारकांकडून पालिकेने तब्बल ४४६.७४ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी हीच वसुली ४४६.४१ कोटी एवढी होती. त्यात आता काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ६०० कोटींचे उद्दिष्ट आता ५६० कोटींवर आले आहे. येत्या २० दिवसांत मात्र या उद्दिष्टाची पूर्ती होईल, असा दावा महापालिकेने केला आहे. यंदाही कळवा, मुंब्रा आणि दिव्यातून वसुलीचे प्रमाण कमी झाले.
मालमत्ता कर विभागाला यंदा ६०० कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु आता २० दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने त्या उद्दीष्टापर्यंत पोहचणे कदाचित मालमत्ता कर विभागाला शक्य होणार नाही. त्यामुळे हे उद्दीष्ट ४० कोटींनी कमी करण्यात येऊन, ५६० कोटी निश्चित करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यात लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी-कर्मचारी व्यस्त होणार असल्याची बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने डिसेंबरच्या आधीपासूनच मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली होती. यामध्ये मालमत्तांचा लिलाव, जप्तीची कारवाई आदींसह इतर मोहीमासुध्दा हाती घेण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ७ मार्च २०१९ पर्यंत मालमत्ता कर विभागाने ४ लाख ७५ हजार ९१५ मालमत्ताधारकांकडून ४४६.७४ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी याच तारखेला ही टक्केवारी ४४६.४१ कोटी एवढी होती. यंदा ३३ कोटींची वाढ झाली आहे.
मुंब्रा, दिव्याची वसुली पुन्हा घसरली, ठाण्यातील लोकमान्य, सावरकरनगरमध्येही घट
मुंब्रा आणि दिव्यात वसुलीचे प्रमाण हे दरवर्षी कमी असल्याचे दिसून आले आहे. यंदासुध्दा ते वाढले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंब्य्रातून ५६ हजार ६६५ मालमत्ताधारकांकडून केवळ १७.२९ कोटींची वसुली झाली आहे. दिव्यातून ८९ हजार ८३ मालमत्ताधारकांकडून ३०.२३ कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षी या दोन्ही प्रभाग समितीमधून ५०.८३ कोटींची वसुली झाली होती. त्या खालोखाल कळवा प्रभाग समितीमधून ५२ हजार २४७ मालमत्ताधारकांकडून २१.५३ कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षी हा आकडा २३.३५ कोटी होता.
त्यानंतर लोकमान्य, सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये वसुली जास्त घटली असल्याचे स्पष्ट होत असून येथून आतापर्यंत २१.१७ कोटी वसुली झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४०.३६ कोटींची वसुली झाली होती. उथळसर प्रभाग समितीमधून ३१.७५ कोटींची वसुली झाली असून मागील वर्षी ४३.०९ कोटींची वसुली झाली होती. वागळे इस्टेट प्रभाग समितीची वसुलीसुध्दा कमी झाली असून ती १८.०७ कोटी एवढी आहे. नौपाडा प्रभाग समितीमधून ६९.८३ कोटी, माजिवडा मानपाडा ११८.८९ कोटी, वर्तकनगर ६७.२२ कोटी आणि हेडआॅफीसमधील वसुली ५०.७६ कोटी अशी जास्तीची वसुली झाली आहे.