मांगरुळ डोंगरावरील वनसंपदा वणव्याच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 21:12 IST2018-11-15T21:11:52+5:302018-11-15T21:12:04+5:30

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यातील मांगरूळ गावाजवळील डोंगरावर लावलेल्या वणव्यात दुस-यांदा वनसंपदा नष्ट झाली आहे.

Recognition of forest resources on Mangrul hill | मांगरुळ डोंगरावरील वनसंपदा वणव्याच्या विळख्यात

मांगरुळ डोंगरावरील वनसंपदा वणव्याच्या विळख्यात

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यातील मांगरूळ गावाजवळील डोंगरावर लावलेल्या वणव्यात दुस-यांदा वनसंपदा नष्ट झाली आहे. या डोंगरावर तीन हेक्टर जागेवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले होते. गेल्यावर्षी हे वृक्ष वणव्यात सापडले होते. त्यानंतरही वनविभागाने पुन्हा ही झाडे जगविली होती. बुधवारी रात्री वणवा लावल्याने यात 70 टक्के वृक्ष जळाले.  

श्रीमलंग गड परिसरातील मांगरुळ या गावी वनविभागाच्या सुमारे 80 एकर जमिनीवर डॉ. शिंदे यांनी गेल्या वर्षी लोकसहभागातून एक लाख झाडे लावण्याचे महाअभियान राबवले होते. तब्बल 15 हजारहून अधिक नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अवघ्या काही तासात एक लाख झाडे लावली होती. या झाडांचे योग्य प्रकारे संगोपन व्हावे, यासाठी शिंदे यांनी या ठिकाणी स्वखर्चाने पाण्याच्या टाक्या आणि जलवाहिन्यांची व्यवस्था केली होती. मात्र वृक्षारोपण केल्यावर या वृक्षांनी मुळे धरलेले असतांनाच गेल्यावर्षी या डोंगरावर वणवा लागला. त्यात 80 टक्के वृक्ष जळाली. सुदैवाने वृक्षाभोवती असलेले सुके गवत काढण्यात आल्याने त्यातील बहुसंख्य वृक्ष वाचविण्यात वन विभागाला यश आले होते. जळालेले वृक्ष वाचविण्यासाठी खासदार शिंदे यांनीही खासगी संस्थांची मदत घेत त्या वृक्षांचे संगोपन केले होते. 

यंदाच्या पावसाळ्य़ात पुन्हा या वृक्षांची वाढ झाली होती. एक लाख वृक्षांपैकी 90 टक्के वृक्ष जिवंत ठेवण्यात यश आले होते. मात्र बुधवारी रात्री याच डोंगरावर वणवा लागल्याने त्यात अडीच हेक्टर डोंगरावरील सर्वच्या सर्व वृक्षांना झळ बसली. त्यातील काही वृक्ष पूर्ण जळाले तर काही वृक्षांना वाचविणो शक्य होणार आहे. सलग दोन वर्ष एकाच डोंगरावर वणवा लागून वृक्ष जळत असल्याने वन विभागाचे अधिकारी नियोजन करण्यात कमी पडत असल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला आहे. एकच चूक दोनवेळा झाल्याने आता खासदार शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

मांगरुळ गावापासून काही अंतरावर हे डोंगर असून या डोंगरावरील वनसंपदा पूर्ण नष्ट झाली होती. गेल्यावर्षी वृक्षारोपण करून पुन्हा या डोंगरावर वनराई निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंबरनाथ तालुक्यात जावसई आणि खुंटवली भागातही वृक्षारोपण करण्यात आले. मात्र या भागात अजूनही वृक्षांना वणव्याचा त्रस झालेला नाही. मात्र मांगरुळ भागात वणवा लावण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

उपमुख्य वनसंरक्षकांच्या निलंबनाची मागणी
मोठय़ा प्रमाणात वनसंपदा असल्याने वन विभागाने कर्मचारी तैनात करणे अपेक्षित होते, असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. वृक्षांच्या संवर्धनासाठी संरक्षक कुंपण घालण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडेही वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. समाजकंटकांकडून आगी लावण्याचे प्रकार होत असल्याचा ठपका शिंदे यांनी ठेवला आहे. ठाण्याच्या उपमुख्य वनसंरक्षकांना जबाबदार धरून निलंबित करण्याची मागणी वनमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Recognition of forest resources on Mangrul hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.