डोंबिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश, पक्षात घुसमट होत असल्याने घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:42 IST2017-10-27T13:38:36+5:302017-10-27T13:42:00+5:30
डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

डोंबिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश, पक्षात घुसमट होत असल्याने घरवापसी
डोंबिवली- डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. डोंबिवलीमध्ये नवीन शहर प्रमुखांच्या नियुक्ती नंतर रवी पाटील यांनी शिवसेना जय महाराष्ट्र करत पुन्हा एकदा काँग्रेसची वाट धरली आहे. रवी पाटील यांनी 2015 च्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढविली पण त्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. डोंबिवलीच्या आहेरे गाव विभागातून रवी पाटील यांनी निवडणूक लढवली. त्या मतदार संघात रवी पाटील यांना भाजपाच्या अॅडव्होकेट तावरे यांची तगडी टक्कर होती. रवी पाटील यांचा पराभव हा शिवसेनेला धक्का मानला जात होता.
गुरुवारी रात्री टिळकभवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत रवी पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रकाश मुथा यांनी पाटील यांना पुन्हा पक्षात प्रवेश घ्यावा असं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रवेश घेतल्याचं कल्याण-डोंबिवली महापालिकेचे गटनेते नंदू म्हात्रे यांनी सांगितलं आहे.
शिवसेनेत माझी घुसमट होत होती, संघटनेत काम केलेला मी माणूस आहे, विधानसभा लढवली असून, तीन वेळा नगरसेवक होतो, पण तरीही मला एका बाजूला ठेवण्यात आलं. हे योग्य नाही, त्यामुळे मी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचं रवी पाटील यांनी म्हंटलं आहे.