चेहरे रंगवत साजरी झाली रंगपंचमी, स्वत्वचे अनोखे सेलिब्रेशन

By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 25, 2024 06:05 PM2024-03-25T18:05:00+5:302024-03-25T18:05:15+5:30

तीन तरुण कवींनी सुंदर मराठी कविता सादर केल्या ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. 

Rang Panchami was celebrated with face painting | चेहरे रंगवत साजरी झाली रंगपंचमी, स्वत्वचे अनोखे सेलिब्रेशन

चेहरे रंगवत साजरी झाली रंगपंचमी, स्वत्वचे अनोखे सेलिब्रेशन

ठाणे : एकीकडे आबालवृद्ध ठाणेकर चक्क रांगा लावून कलाकारांकडून त्यांना हवे तसे चेहरे रंगवून घेत होते, सोबत कराओके, कविता, कॉमेडी, ड्रमिंग याचे सादरीकरण व एकूण उत्साहाच्या आनंदाच्या आणि तरीही बिलकुल बीभत्स, ओंगळ प्रकार नसलेल्या वातावरणात रंगपंचमी साजरी झाली. यंदा सलग पाचव्या वर्षी स्वत्व ठाणे व उत्सव ठाणे आणि इतर संस्थानी मिळून एक अनोखी होळी हा उपक्रम कचराळी तलाव येथील खुल्या रंगमंचाच्या परिसरात राबविला. 

सकाळी ८ वा. चेहरे रंगविण्याची व्यवस्था, इतर कार्यक्रमाना बसायची व्यवस्था अशी जय्यत तयारी होती. लोक येऊ लागताच स्वत्वचे कलाकार त्यांचे चेहरे कलात्मक प्रकारे रंगवून देत होते. बाजूला स्वत्व ड्रम सर्कलचे ड्रम वादन सुरु असल्याने लोक रंगविलेल्या चेहऱ्यांनी नाचू लागत. अक्षय जाधव यांच्या ए के लाइव्ह बँडची गाणी सुरु झाली. लोकांची चेहरे रंगवून घ्यायला रीघ लागली. बँडनंतर अथर्व हिंगणे आणि चार कलाकारांनी स्टँड अप कॉमेडी सादर केली. यात ठाण्यातील जुने नागरिक डॅनियल यांचाही सहभाग होता. त्यानंतर तीन तरुण कवींनी सुंदर मराठी कविता सादर केल्या ज्याला प्रेक्षकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. 

मूळ नेपाळचे असलेले ठाणेकर विनोद शर्मा यांनी अस्सल आगरी भाषेतील सादर केलेल आगरी रामायण प्रेक्षकांनी उचलून धरले. ज्येष्ठ तबलावादक पं. मुकुंदराज देव. कत्थक गुरु मंजिरी देव, बनारस घराण्याचे कथक कलाकार सौरव मिश्रा, चित्रकार निकम असे कलाकार या कार्यक्रमाला आवर्जून ऊपस्थित होते, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  अहिवर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि सीए संजीव ब्रह्मे, रिस्पॉन्सिबल नेटिझन्सचे उन्मेष जोशी, रोटरियन श्याम माडीवाले, वयमचे राजेंद्र गोसावी असे अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी आपले चेहरे रंगवून घेतले. यावेळी राजेश मोरे, रुचिता मोरे हे देखील उपस्थित होते. “आम्ही ही अनोखी होळी सध्या होणाऱ्या प्रकारांना एक सशक्त पर्याय म्हणून साजरी करीत आहोत दरवर्षी लोकांचा प्रतिसाद वाढत आहे. असे कार्यक्रम इतर शहरात व गवात सुद्धा व्हावे आणि परंपरेसोबत वेगळ्या संकल्पनांची सांगड घालावी हा स्वत्व ठाणे आणि उत्सव ठाणे च्या विचारांचा गाभा आहे “असे मत श्रीपाद भालेराव यांनी व्यक्त केले. शेवटी सर्वानी “जय जय महाराष्ट्र माझा” म्हटले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Rang Panchami was celebrated with face painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे