बेस्ट लक खांडेकर! सायकलवर करणार १९ हजार ८०० किमीचा परदेश प्रवास
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 17, 2025 18:02 IST2025-06-17T18:01:22+5:302025-06-17T18:02:18+5:30
आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनने दिली माहिती. खांडेकर यांनी देश-विदेशात आतापर्यंत ६० हजारो हून अधिक किलोमीटर सायकल प्रवास केलेला आहे

बेस्ट लक खांडेकर! सायकलवर करणार १९ हजार ८०० किमीचा परदेश प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनचे सदस्य, ठाणेस्थित ५२ वर्षीय राजेश खांडेकर हे सायकलवर नवा विक्रम रचणार आहेत. ते घोडा सायकलवर अर्जेंटिना ते कॅनडा असा १९ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनच्यावतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
खांडेकर यांनी देश-विदेशात आतापर्यंत ६० हजारो हून अधिक किलोमीटर सायकल प्रवास केलेला आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे त्यांचा अर्धवट राहिलेला सायकल प्रवास ते पुन्हा नव्याने सुरू करून एक नवा विक्रम रचणार आहेत. हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातील नव्हे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी असणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. २० जून २०२५ रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघणार आहेत आणि अर्जेंटिनाला पोचल्यावर २४ जून रोजी त्यांचा कॅनडासाठी सायकलवर प्रवास सुरू होणार आहे. यादरम्यान ते १७ देश पूर्ण करणार आहेत अशी माहिती खांडेकर दिली. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान ते जेवणाचे, निवासाचे साहित्य देखील सोबत नेणार आहेत. आणि प्रवासादरम्यान स्वतः जेवण बनवून आर्थिक बचत करणार आहेत. या प्रवासादरम्यान ते फिट रहा, हिट रहा, त्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत. खांडेकर यांचा हा प्रवास नऊ महिन्यांचा आहे. आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनच्या सहकार्याने खांडेकर ही मोहीम पूर्ण करणार आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी तशी त्यांची मानसिक तयारी देखील केली आहे. या पत्रकार परिषदेला खांडेकर यांच्यासह संस्थेचे सचिव दीपेश दळवी, सदस्य अजय भोसले, सदस्य गुरुप्रसाद देसाई आदी उपस्थित होते.
-------------
खांडेकर यांनी 23 किलो वजनाची पुशिंग सायकल स्वतः तयार केली आहे. ही सायकल एका पायाने ढकलावी लागते अशाप्रकारे त्यांनी या सायकलवर साडेतीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक कश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला आहे.