चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 08:06 IST2025-12-12T08:00:33+5:302025-12-12T08:06:27+5:30
रेल्वेतील काही पदांसाठी अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळाने १९ ऑक्टाेबर २००८ राेजी परीक्षेचे आयाेजन केले हाेते. मुंबईत या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय तसेच बिहारी उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आराेप झाला हाेता.

चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
ठाणे : रेल्वेने २००८मध्ये राबविलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी उत्तर भारतीय उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात सात कार्यकर्त्यांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खटला दाखल करण्यात आला हाेता. या खटल्याच्या सुनावणीकरिता राज यांनी गुरुवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात हजेरी लावली. त्यावेळी आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचे त्यांनी न्यायालयापुढे सांगितले. चिथावणीमुळे घटना घडल्याच्या आरोपाला त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. सुनावणीदरम्यान न्यायालयाला सहकार्य करा, महिनाभरात खटला निकाली लागण्याची शक्यता असल्याचेही ठाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
शाळकरी मुलांना ‘एआय’ शिकवण्याची इतकी घाई कशाला?
रेल्वेतील काही पदांसाठी अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळाने १९ ऑक्टाेबर २००८ राेजी परीक्षेचे आयाेजन केले हाेते. मुंबईत या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय तसेच बिहारी उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आराेप झाला हाेता. याचसंदर्भात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात आकाश काळे, संताेष ठाकरे, विशाल कांबळे, कैलाश चाैबे, गणेश चाैबे, शैलेश जैन आणि नीलेश घाेणे या सातजणांविरूद्ध २०१९मध्ये आराेपपत्र दाखल झाले हाेते. पुरवणी आराेपपत्रात मनसे अध्यक्ष राज यांचेही नाव समाविष्ट केले हाेते.
आराेपींपैकी नीलेश घाेणे याचा मृत्यू झाला. यापूर्वीची सुनावणी १२ नाेव्हेंबर २०२५ राेजी झाली हाेती. त्यावेळी राज हे न्यायालयात गैरहजर हाेते. १२ डिसेंबरच्या सुनावणीसाठी सर्व आराेपींना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले हाेते. शिवाय (राज ठाकरे वगळता) सातही आराेपींना न्यायालयाने अटक वाॅरंट बजावले हाेते. त्यामुळेच गुरुवारी राज यांच्यासह इतर आराेपी न्यायालयात हजर हाेते.
१० मिनिटांत सुनावणी
५ ते १० मिनिटांच्या सुनावणीनंतर राज न्यायालयाच्या बाहेर पडले. ॲड. राजेंद्र शिराेडकर, सयाजी नांगरे, ओंकार राजूरकर आणि मंदार लाेणारे यांनी राज यांच्यासह इतर आराेपींची बाजू मांडली.
राज ठाकरे वगळता सात आराेपींना प्राेक्लमेशन जारी केले हाेते. आज सर्व आराेपींचे प्राेक्लेमेशन रद्द झाले. पुढील सुनावणी आता १६ डिसेंबरला हाेणार आहे.
ॲड. ओकार राजूरकर, राज ठाकरे यांचे वकील