घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
By अजित मांडके | Updated: September 29, 2025 09:12 IST2025-09-29T09:10:56+5:302025-09-29T09:12:25+5:30
वंडी-नाशिक महामार्ग किंवा घोडबंदर मार्ग या दोन्ही मार्गांवर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वळण देण्यात आले आहे. येथील रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
अजित मांडके
प्रतिनिधी
वंडी-नाशिक महामार्ग किंवा घोडबंदर मार्ग या दोन्ही मार्गांवर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वळण देण्यात आले आहे. येथील रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नाशिकवरून भिवंडीपर्यंत अवघ्या दोन तासांत प्रवास होतो. मात्र, भिवंडी ते ठाणे या १५ ते २० मिनिटांच्या प्रवासासाठी अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. तिकडे घोडबंदर मार्गावर अशीच परिस्थिती आहे.
मुंबईवरून नाशिककडे जाण्यासाठी आणि नाशिकवरून मुंबईकडे येण्यासाठी भिवंडी हाच महामार्ग महत्त्वाचा आहे. दरवर्षी येथील रस्त्याला खड्डे पडतात. मागील काही वर्षांपासून येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ते पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने रस्त्यांना वळण देण्यात आले. रस्त्यांची अपूर्ण कामे आणि रस्त्यांना पडलेले भलेमोठे खड्डे यामुळे वाहनचालकांना दरवर्षी पावसाळ्यात तारेवरची कसरत करावी लागते. नाशिकहून लवकर मुंबई गाठण्यास प्रवासी आसनगावला आल्यावर पुलाच्या कामामुळे आणि रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रखडतो. तेथून कसाबसा बाहेर पडल्यानंतर पुढे भिवंडीत एन्ट्री केल्यावर माणकोलीपासून ते माजिवडापर्यंत येण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो.
अशीच काहीशी स्थिती घोडबंदर मार्गाची आहे. मागील काही वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू आहे. आता सेवारस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम सुरू आहे. विलीनीकराच्या कामाला रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. हा निर्णय म्हणजे येथील रहिवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचेही खासगीत पोलिस अधिकारीही सांगतात; परंतु राजकीय नेत्यांच्या अट्टहासापुढे यंत्रणा हतबल आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची वाताहत झाली आहे. गायमुख घाटाचे काम तीन ते चार वेळा केले. तरीही हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे गुजरात, वसईवरून येणाऱ्या वाहनांना गायमुख घाटापासून वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.
घोडबंदर व नाशिक मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहतूक ठराविक कालावधीत बंद करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला घेतला. सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात आली; परंतु अवघ्या दोन दिवसांत हा निर्णय बदलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. ठाण्यात अवजड वाहतूक बंद केली तरी तिकडे भिवंडीत अवजड वाहने आणि इकडे फाउंटनपासून पुढे वसई मार्गावर अवजड वाहने रस्त्यावर उभी राहू लागली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूककोंडीत भर पडली. तसेच गुजरातवरून येणाऱ्या व्यापारी वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत अवजड वाहतुकीच्या वेळेत पुन्हा बदल झाला. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवजड वाहतूक सुरू झाली. त्याचा परिणाम ठाण्यात पुन्हा कोंडी वाढली. दुसरीकडे गुजरात, वापीमध्ये डिझेल स्वस्त असल्याने अवजड वाहनचालक आपल्या वाहनात डिझेल कमी ठेवतात. त्याचा परिणाम असा होतो की, घोडबंदर येथील चढण चढताना डिझेल इंजिनपर्यंत पोहोचत नसल्याने वाहने बंद पडतात. परिणामी घोडबंदर भागातील कोंडी सुटता सुटत नाही.