आपल्यातील 'मी' सोबत अंतर्मुख आणि बहिर्मुख होता आले पाहिजे - डॉ. आनंद नाडकर्णी
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 19, 2023 15:41 IST2023-10-19T15:41:24+5:302023-10-19T15:41:34+5:30
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते डॉ. आनंद नाडकर्णी, निवेदिका हर्षदा बोरकर यांचा सन्मान करण्यात आला

आपल्यातील 'मी' सोबत अंतर्मुख आणि बहिर्मुख होता आले पाहिजे - डॉ. आनंद नाडकर्णी
ठाणे : माणसाच्या आतल्या 'मी' ला जेव्हा बाहेरच्या 'मी' ला मिळतो तेव्हा नाती तयार होवून 'आम्ही' तयार होतो. तसेच माणसाच्या आतल्या 'मी' ला जेव्हा आतलाच 'मी' मिळतो तेव्हा माणसामध्ये अहंम भाव तयार होतो. माणसाला त्याच्यातील आतल्या 'मी' ला बाहेरच्या 'मी' सोबत जोडण्यासाठी बर्हि:मुख होता आले पाहिजे आणि आतल्या 'मी' सोबत अंतर्मुख होता आले पाहिजे. बर्हि:मुखता आणि अंतर्मुखता याचा समतोल व्यक्तिमत्वामध्ये माणसाला साधता येणे महत्वाचे असल्याचे स्पष्ट मत मनोविकार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मांडले.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित विचारमंथन या व्याख्यानमालेतील दहावे पुष्प प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ. नाडकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीने गुंफले. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 'या मी मी च काय करायचं' या विषयावर डॉ. नाडकर्णी यांच्याशी निवेदिका हर्षदा बोरकर यांनी ओघवत्या शैलीत संवाद साधला.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते डॉ. आनंद नाडकर्णी, निवेदिका हर्षदा बोरकर यांचा सन्मान करण्यात आला. माणसाची त्याच्यातील आतल्या 'मी' सोबत मैत्री व्हावी यासाठी मानसशास्त्र आणि अध्यात्म दोन्ही काम करत आहेत. माणसाचा आतल्या 'मी' सोबत चांगला संवाद झाला तर माणूस हा प्रगतीकडे जात असतो. माणूस हा निसर्गाचाच भाग आहे, माणसांकडे निरिक्षणासाठी असलेली दृष्टी जर त्याने योग्य पध्दतीने वापरली तर माणूस निसर्गाकडून खूप काही शिकू शकतो. निसर्गामध्ये दोन झाडे एकमेकांशी भांडताना आपण पाहिलेले नाही. निसर्गाचे अवलोकन हे परंपरेमध्ये सुद्धा मांडले गेली आहे. निसर्ग हा आपल्याला उत्पत्ती, स्थिती,लय देतो तसा निसर्ग हा विनाशाची शक्ती सुद्धा दाखवतो. निसर्ग हा वैविध्याचा स्वीकार करतो, उच्च-नीचता माणसाने आणली, तेव्हा माणसाने भेद निर्माण केला असल्याचेही डॉ. नाडकर्णी यांनी नमूद केले.