६० लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड; याेजनांच्या यशामुळेच जनतेने बहुमत दिले - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 07:09 IST2025-01-19T07:08:05+5:302025-01-19T07:09:18+5:30
पंतप्रधान नरेद्र माेदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वामित्व योजनेचा शुभारंभ देशभर झाला.

६० लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड; याेजनांच्या यशामुळेच जनतेने बहुमत दिले - एकनाथ शिंदे
ठाणे : अनेक याेजनांच्या देदीप्यमान यशामुळेच अडीच वर्षांच्या कारकिर्दीची पाेचपावती महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आणि २३२ आमदार निवडून आणले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले.
पंतप्रधान नरेद्र माेदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वामित्व योजनेचा शुभारंभ देशभर झाला. महाराष्ट्रातील सुमारे ६० लाख लोकांना या याेजनेतून प्रॉपर्टी कार्डचे वितरण होणार आहे, असे शिंदे म्हणाले.
स्वामित्व याेजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम शनिवारी झाला. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी प्रातिनिधिक प्राॅपर्टी कार्डचे वितरण नवी दिल्ली येथे करून याेजनेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाचे आयोजन दूरदृश्यप्रणालीद्वारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन भवनमध्ये केले होते.
३६,१९५ लाभार्थी गावे
राज्यातील ३६ हजार १९५ गावांना या याेजनेचा लाभ होणार आहे. तर १५,३२७ गावांची प्रॉपर्टी कार्ड तयार आहेत. २३ हजार १३२ गावांचे अंतिम नकाशे तयार झाले आहेत. या गावांचे ड्राेन सर्वेक्षण झाले आहे. ड्राेन मॅपिंगद्वारे ग्रामीण भागातील जमिनीचे सीमांकन होत आहे, असे शिंदे यांनी सांगितले.