- राजू ओढे, ठाणे
रिक्षाचालकांची अवस्था शेतकऱ्यांप्रमाणे आहे. ‘ओला-उबेर’ने या व्यवसायाची ऐशीतैशी केली आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच आॅटो-टॅक्सीचालकांवरही आत्महत्येची पाळी आली आहे. आॅटोचालक संख्येने जास्त असले, तरी राज्यकर्त्यांना त्यांची आठवण केवळ निवडणुकीच्या वेळीच होते. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. त्यामुळे आमच्या समस्या सोडवेल, त्याच पक्षाला थारा देण्याचा निर्धार आॅटोचालकांनी व्यक्त केला.राजकीय वारे सर्वच क्षेत्रांत पोहोचले आहेत. आॅटोचालकही त्यापासून दूर राहिले नाहीत. व्यापार आणि वैद्यकीय शाखेप्रमाणेच आॅटोचालक संघटनेतही राजकीय पक्षांच्या आघाड्या कार्यरत झाल्या आहेत. जेवढे पक्ष तेवढ्या आॅटोचालकांच्या वेगवेगळ्या संघटना ठाण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे या संघटनांनी त्यात्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. गत ४० वर्षांपासून सक्रिय असलेली विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी युनियन ठाण्यातील पहिली आणि बव्हंशी निष्पक्ष संघटना आहे. ठाण्यातील प्रवाशांची नेआण करण्यासाठी जवळपास ३० हजार आॅटोचालक दिवसरात्र रस्त्यांवर धावतात. ३० हजार चालक, जवळपास ४०० टॅक्सीचालक आणि त्यांची कुटुंबे म्हटली की, हा घटक कोणत्याही राजकीय पक्षाकडून दुर्लक्ष करण्यासारखा नक्कीच नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष या घटकाकडे लक्ष ठेवून आहे. त्याअनुषंगाने ठाण्यातील काही आॅटोचालक आणि त्यांच्या संघटनांची मते जाणून घेतली असता सर्वच पक्षांविषयी त्यांच्यात कमालीची नाराजी दिसून आली.परिवहन विभागाने सर्वच सेवांसाठी केलेली प्रचंड दरवाढ आॅटोचालकांच्या जिव्हारी लागली आहे. दिवसभर मेहनत करून ५०० ते १००० रुपयांची कमाई होते. ही दरवाढ झेपणारी नसून याबाबत शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी आॅटोचालकांनी केली आहे. शहरात आॅटोस्टॅण्ड पुरेसे नाहीत. आॅटोस्टॅण्डसाठी जागाही पुरेशी नसते. बरेचदा या जागांवर खासगी वाहनांचे अतिक्रमण असते. यातून वाद होतात. बळी मात्र नेहमी आॅटोचालकांचाच जातो, असा आरोप त्यांनी केला.पोलिसांची दादागिरी नेहमी आॅटोचालकांवरच चालते. गणवेश, कागदपत्रे आदी मुद्यांवर केवळ आॅटोचालकांचे कान पिळले जातात. ओला-उबेरच्या गाड्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पोलिसांना नियमित हप्ते दिले नाही, तर जास्त त्रास दिला जातो, असा आरोप त्यांनी केला. रेल्वेस्थानकावर आॅटोरिक्षा आणि टॅक्सी उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा नसते. भरीसभर, मुंबईच्या टॅक्सी या भागात गर्दी करतात. ठाण्यातील रिक्षा, टॅक्सींना मुंबईतून भाडे घेण्यास मज्जाव केला जातो. मुंबईचे टॅक्सीचालक मात्र ठाण्यातून बिनधास्त भाडे घेऊन जातात. त्यांना कुणीही रोखत नाही. रिक्षाचालकांना विसाव्यासाठी जागा हवीशहरात आॅटोचालकांना विसावा घेण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नाही. काही प्रमुख आॅटोस्टॅण्डजवळ महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास आॅटोचालकांना अल्पकाळ विश्रांती घेणे शक्य होईल, असे मत विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी युनियनच्या कार्यकारिणीचे सदस्य ऋषीकेष पाटील यांनी व्यक्त केले. रिक्षाचालकांच्या अनेक समस्या ठाण्यातील लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नसल्याची नाराजी आॅटोचालकांनी व्यक्त केली. आम्हा अनेक आॅटोचालकांच्या समस्यांचा जो पक्ष गांभीर्याने विचार करेल, त्याच पक्षाची निवड आम्ही करणार असल्याचा निर्धार या चालकांनी व्यक्त केला.आॅटोचालकांकडे केवळ नकारात्मक दृष्टीने बघणे चुकीचे आहे. बोटांवर मोजण्याएवढे आॅटोचालक चुकीचे वागत असतील, याचा अर्थ सर्वच वाईट आहेत, असे नाही. त्यांच्या समस्यांकडेही गांभीर्याने बघण्याची गरज आहे. -भाई टिळवे, अध्यक्ष, विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी युनियन