ऑक्सिजन प्लँटसाठी खासगी कंपनी सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:04+5:302021-04-30T04:51:04+5:30
अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन राज्य सरकारने ...

ऑक्सिजन प्लँटसाठी खासगी कंपनी सरसावली
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्याला प्रतिसाद देत डोंबिवलीतील घरडा केमिकलने एक कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिला आहे, अशी माहिती कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांनी ‘लोकमत’ला दिली.
सोनी म्हणाले की, कल्याण-डोंबिवली शहरांजवळ ऑक्सिजन प्लँट उभारण्याची मागणीही घरडा केमिकलने राज्य सरकारकडे केली आहे. सुमारे २०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर तयार करण्याची क्षमता असलेला प्लँट तयार करण्यासाठी एवढा निधी कंपनीने दिला आहे. हा निधी कंपनीने बुधवारी मुख्यमंत्री निधीला वर्ग केला आहे. याबाबत ‘केडीएमसी’चे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनाही कळविले आहे. त्यामुळे आता हा प्लँट केडीएमसी परिसरात उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.
कोविडच्या काळात वर्षभरात केडीएमसी हद्दीत एक लाखाहून रुग्ण बरे होऊन गेले आहेत; परंतु असे असले तरीही ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना खूप कष्ट घ्यावे लागले होते. भविष्यात तशी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी केडीएमसी हद्दीत प्लँट असावा, अशी अपेक्षा सोनी यांनी व्यक्त केली.
-------------