सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 06:28 IST2025-10-27T06:28:10+5:302025-10-27T06:28:34+5:30
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती विभागावर ताण कायम

सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
ठाणे :ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती विभागावर सलग दुसऱ्या दिवशीही ताण कायम होता. शनिवारी प्रसूतिगृहात दाखल झालेल्या ३२ महिलांपैकी २ महिलांना दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले. तर २५ बेडची क्षमता असल्याने प्रसूतिगृहात आणखी पाच बेड दाटीवाटीने लावण्यात आले. रविवारी आणखी सहा महिला वेटिंगवर असल्याचे चित्र होते. या महिलांना ५८ बेडची क्षमता असलेल्या दुसऱ्या वॉर्डात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, प्रसूतीनंतर महिलांना या विभागात हलवण्यात येते. त्यामुळे या महिलांना सुविधा पुरवताना रुग्णालय प्रशासनाची कसरत होणार असून संबंधित महिलांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
शनिवारीदेखील रुग्णालयात ३२ महिला दाखल होत्या आणि आठ महिला प्रतीक्षेत होत्या. रुग्णालय प्रशासनाने रविवारी एकाही गरोदर महिलेला इतर रुग्णालयात पाठविले नसल्याचा दावा केला. हे रुग्णालय गोरगरिबांसाठी उपचार देणारे प्रमुख सरकारी रुग्णालय असून, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, सुविधा अपुऱ्या असणे आणि प्रशासकीय गोंधळामुळे रुग्णालय प्रशासनावर जोरदार टीका होत आहे.
सुविधा पुरवताना डॉक्टर, परिचारिकांची तारांबळ, २५ बेड अन् ३० महिला भरती
अलीकडेच नऊ महिने १० दिवस पूर्ण झालेल्या एका गर्भवती महिलेला येथे बेड न मिळाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवावे लागले होते, ज्यामुळे तिला नाहक त्रास सहन करावा लागला. रुग्णालयातील प्रसूती विभागात केवळ २५ बेड असून, सध्या या ३० महिला दाखल आहेत.
दाटीवाटीने बेड लावून या महिलांवर उपचार करण्यात येत आहेत. परंतु, प्रसूती विभागात सोयीसुविधा देताना आणि उपचार करताना डॉक्टर, परिचारिकांची तारांबळ उडत असल्याचे सध्या चित्र आहे.
प्रसूतीनंतर ठेवण्यात येणाऱ्या विभागात देखील ५० बेड अन् ५८ महिला दाखल
प्रसूतीनंतर ठेवण्यात येणाऱ्या विभागात ५० बेडची क्षमता असून त्यात ५८ महिला दाखल असल्याचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी सांगितले. त्यांनी रविवारी १० महिलांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच, रविवारी एकाही गरोदर महिलेला इतर रुग्णालयात हलविण्यात आले नसल्याचाही दावाही केला.