ठाण्यातील चार पोलीस अधिक-यांना उत्कृष्ठ सेवेचे राष्ट्रपती पदक जाहीर

By जितेंद्र कालेकर | Published: January 25, 2018 09:57 PM2018-01-25T21:57:13+5:302018-01-25T22:21:15+5:30

देशभरातील अनेक पोलिसांना उत्कृष्ठ सेवेचे आणि अतुलनीय कामगिरीबद्दल राष्टÑपती पदक जाहीर झाले आहे. यात ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्यासह चार अधिका-यांचा समावेश आहे.

 The President's Medal of Excellence for the Four Police Thane Police More | ठाण्यातील चार पोलीस अधिक-यांना उत्कृष्ठ सेवेचे राष्ट्रपती पदक जाहीर

पोलीस वर्तूळातून अभिनंदनाचा वर्षाव

Next
ठळक मुद्देठाणे ग्रामीणचे डॉ. महेश पाटील यांचाही समावेशठाणे शहरातील तीन एसीपींंनाही राष्टÑपती पदकपोलीस वर्तूळातून अभिनंदनाचा वर्षाव

जितेंद्र कालेकर
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शांताराम अवसरे, डोंबिवलीचे रविंद्र वाडेकर आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना पोलीस सेवेतील अतुलनीय कामगिरीबद्दल तर गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांना विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल राष्टÑपतींचे पदक जाहीर झाले आहे. यानिमित्त या अधिक-यांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये एसीपी असलेले अवसरे १९८७ मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत भरती झाले. त्यांनी आतापर्यंत मुंबई शहर, नाशिक ग्रामीण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि ठाणे शहर आदी ठिकाणी उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. दरोडे, घरफोडया आणि खून अशा अनेक गुन्हयांच्या कौशल्यपूर्ण तपासाबद्दल त्यांना २४० बक्षिसे मिळाली आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे नाशिकच्या कुंभमेळयात ते पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातच कुंभमेळयाचा परिसर असल्याने त्यांनी कुंभमेळयाची कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळली होती. सटाण्यातील एका मुलाचे पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले होते. त्यावेळी अवसरे हे वणी या अन्य पोलीस ठाण्यात कार्यरत असतांनाही त्यांनी या मुलाची सुखरुप सुटका केली होती. त्यांच्या याच तपासाबद्दल त्यांना उत्कृष्ठ तपास अधिकारी हा मार्च २००५ चा पोलीस महासंचालकांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१२ मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले. आणि आता संपूर्ण कागगिरीच्या आढाव्याने २०१८ मध्ये राष्टÑपती पदक त्यांना जाहीर झाले आहे. पोलीस सेवेत केलेल्या चांगल्या कामाचे चीज झाल्याची प्रतिक्रीया त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.
१९८६ मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत रुजू झालेले बाजीराव भोसले सध्या ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभगात कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, सातारा, नाशिक शहर, अकोला आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागात आपली चमकदार कामगिरी दाखविली आहे. २५ ते ३० दरोडे, अनेक घरफोडया, खून अशा अनेक क्लिष्ट गुन्हयांचा कौशल्यपूर्ण तपास केल्याबद्दल त्यांना आतापर्यंत ३०० बक्षिसे मिळाली आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना त्यांनी सात जणांच्या टोळीला पकडून त्यांच्याकडून एकाचवेळी चोरीतील ११८ मोटारसायकलीं हस्तगत केल्या होत्या. पनवेल शहरात असतांना मुस्लीम बांधवांशी समन्वय साधून उच्च न्यायालयाच्या आदेशाने संपूर्ण शहरातील मस्जिदवरील भोंगे त्यांनी उतरवले होते. त्यांच्या उत्कृष्ठ कामाची दखल घेऊन त्यांना यापूर्वी २०१० मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले. तर २०११ मध्ये पहिल्यांदा राष्टÑपतीं पदकाने सन्मानित करण्यात आले. यंदा दुस-यांदा त्यांना राष्टÑपतींचे पदक जाहीर झाले आहे. पोलीस सेवेत काम करतांना कुटूंबिंयानी दिलेली साथ, आपल्या कामातील निष्ठा आणि वरीष्ठांकडून मिळालेले मार्गदर्शन त्यामुळेच पुन्हा राष्टÑपतींचे पदक मिळाले असून त्याचे आपल्याला समाधान असल्याची प्रतिक्रीया भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.
सध्या डोंबिवली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त असलेले रविंद्र वाडेकर जून १९८७ मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत रुजू झाले. आतापर्यंत मुंबई शहर, ठाणे शहर, नाशिक, मुंबई वाहतूक शाखा आणि राज्य गुप्त वार्ता विभागात त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. आतापर्यंत त्यांना २०० हून अधिक बक्षिसे मिळाली आहेत. एका गोळीबाराच्या प्रकरणात भिवंडीतील पडघ्यातून त्यांनी साकीब नाचण याला अटक केली होती. अंडरवर्ल्डमधील तीन नामचीन गुंडांचा चकमकीत खात्मा करुन त्यांनी मुंबईतील टोळी माफीयावर काही प्रमाणात अंकुश आणला होता.

प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल शासनाने दखल घेऊन राष्टÑपती पदक जाहीर केल्याबद्दल गृहखात्यासह वरीष्ठ अधिका-यांचे आभारी असून खूप आनंद झाल्याची प्रतिक्रीया वाडेकर यांनी व्यक्त केली.
ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनाही पोलीस सेवेतील उल्लेखनीय सेवेचे राष्टÑपतीपदक जाहीर झाले आहे. ते १९९८ मध्ये उपअधीक्षक म्हणून नागपूर येथे रुजू झाले. नागपूर, पुणे, वसई, ठाणे ग्रामीण आदी शहरामध्ये त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. पुण्याच्या दापोडीतील दारुच्या व्यवसायात गुंतलेल्या एका वसाहतीचे पुनर्वसन करुन त्यांना नविन उद्योगधंदे दिले. तर ठाण्यातील बेकायदेशी दारु निर्मितीच्या धंदयामध्ये गुंतलेल्या ६० जणांचेही त्यांनी पुनर्वसन करुन चौकटीबाहेरचा एक अनोखा उपक्रम यशस्वी केला. २०१० मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले असून उत्कृष्ठ कामगिरीचे १०५ प्रशस्तीपत्रकांद्वारे त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

राष्टÑपती पदक म्हणजे सर्व सहकारी टीमचा हा गौरव असून आई वडील, कुटूंबिय यांचेही योगदान त्यात आहे. या पदकाबद्दल विशेष समाधान असल्याची प्रतिक्रीया डॉ. महेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.

Web Title:  The President's Medal of Excellence for the Four Police Thane Police More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.