...म्हणून 'या' ठिकाणी मिळतंय 1 रुपये लीटर पेट्रोल; पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:37 IST2022-04-25T15:27:57+5:302022-04-25T15:37:21+5:30
Pratap Sarnaik Birthday : ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेवक आशा डोंगरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे आणि अब्दुल सलाम यांनी कैलास पेट्रोल पंपावर सकाळी 10 वाजता स्वस्त पेट्रोल देण्यास सुरुवात केली.

फाईल फोटो
मुंबई : गेल्या महिन्यात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परंतु आजच्या दिवशी ठाण्यात पेट्रोल 1 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. हे वाचून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे पूर्णपणे खरं असून पेट्रोल घेण्यासाठी येथे लोकांनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त (Pratap Sarnaik Birthday) आज ठाण्यातील कैलास पेट्रोल पंपावर 1 रुपये लिटर पेट्रोल दिले जात आहे.
1000 वाहन चालकांना दिले पेट्रोल
ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेवक आशा डोंगरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे आणि अब्दुल सलाम यांनी कैलास पेट्रोल पंपावर सकाळी 10 वाजता स्वस्त पेट्रोल देण्यास सुरुवात केली. जवळपास 1000 चालकांना 1 रुपये प्रतिलिटर पेट्रोल देण्यात आले. या पेट्रोलची किंमत 1 लाख 20 हजार इतकी होती. यावेळी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. याचबरोबर, यावेळी देशातील वाढत्या पेट्रोलच्या दरांविरोधात शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक निषेध करण्यात आला.
20 व्या दिवशी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल नाही
सोमवारी सकाळी देशातील बड्या तेल कंपन्यांनी सलग 20 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे. अशा परिस्थितीत 1000 चालकांना 1 रुपये लिटरने पेट्रोल दिल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई
दरम्यान, गेल्या महिन्यात ईडीने आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांची 11.35 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.