कळणाच्या भाकरीवर झणझणीत मिरचीचा ठेचा
By Admin | Updated: April 24, 2017 02:25 IST2017-04-24T02:25:28+5:302017-04-24T02:25:28+5:30
खापरावरील पुरणपोळी, ज्वारी आणि उडदाची- कळणाची भाकरी, त्यावर झणझणीत मिरचीचा ठेचा... अशा अस्सल खान्देशी

कळणाच्या भाकरीवर झणझणीत मिरचीचा ठेचा
डोंबिवली : खापरावरील पुरणपोळी, ज्वारी आणि उडदाची- कळणाची भाकरी, त्यावर झणझणीत मिरचीचा ठेचा... अशा अस्सल खान्देशी खासियतीच्या पदार्थांची चव चाखण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खान्देश महोत्सवात. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या पुढाकाराने हा महोत्सव भरवला गेला.
खडकपाडा येथील साई चौकात हा खान्देशी महोत्सव सुरू आहे. त्याचे उद््घाटन आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, केडीएमएसीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर, अनिल बोरनारे, दीपेश मेहता, खान्देशी संस्थेचे विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नोकरीधंद्यासाठी आलेल्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी, आपली आधीची पिढी या मातीत वाढली याचा विसर पडू नये, म्हणून १७ जिल्ह्यातील खाद्यपदार्थ माणसाला जोडण्याचे काम करत आहे, अशी भावना निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली. असा उपक्रम सातत्याने राबवावा, असी सूचनाही त्यांनी केली.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. खान्देशातही शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहे. पण हा विषय सभागृहात साधा चर्चिलाही जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव मिळावा, या उद्देशाने खान्देशी महोत्सव आयोजित केल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. शेतकऱ्यांनी ४० स्टॉलचे आॅनलाईन बुकिंग केले. धुळे, जळगाव, नंदुरबार येथील शेतकरी यात सहभागी झाले आहेत.
दोन्ही हातांवर फुलवत फुलवत वाढवत नेलेली खापरावरची पुरणपोळी पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. ही पुरणपोळी १०० रूपयांला एक याप्रमाणे विकली जात होती. तिच्यासाठी गावाकडील सेंद्रीय गुळाचा वापरण्यात आला होता. खापरावर पुरणपोळी बनविण्याची कला कमी होत चालल्याने, त्या पोळ््या कमी ठिकाणी मिळत असल्याने नागरिकांनी मोठया प्रमाणावर तिची खरेदी केली. (प्रतिनिधी)