लसीकरणावरून बदलापुरात आता सोशल मीडियावरून पोस्टबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST2021-07-27T04:41:58+5:302021-07-27T04:41:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : खासगी लसीकरण शिबिर लावताना त्या शिबिरात लसीची मात्रा कमी दिली जात असल्याचा आरोप आमदार ...

लसीकरणावरून बदलापुरात आता सोशल मीडियावरून पोस्टबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : खासगी लसीकरण शिबिर लावताना त्या शिबिरात लसीची मात्रा कमी दिली जात असल्याचा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला होता. या आरोपाला शिवसेनेने प्रत्युत्तर दिल्यानंतर हे प्रकरण शांत होईल असे वाटत होते. मात्र आमदारांनी पुन्हा एक सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपले आरोप बदलापुरात शिबिर राबविणाऱ्यांवर नव्हते, तरीदेखील त्यांनी हे आरोप स्वतःवर ओढवून घेतले. ‘लेकी बोले सुने लागे’, अशी नवीन पोस्ट टाकण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीला टार्गेट केलेले दिसत आहे.
बदलापूर शहरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कमी किमतीत खासगी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांना लस ३०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी आमदार किसन कथोरे आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकून लसीकरण करताना लसीची मात्रा कमी दिली जात असल्याचा आरोप केला होता. भाजपच्या या आरोपानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी त्याला प्रत्युत्तर देत आमचे काम पाहवत नसल्याचा आरोप केला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रतिउत्तर दिल्यानंतर आमदार कथोरेंच्या माध्यमातून पुन्हा एक पोस्ट समाज माध्यमांवर टाकण्यात आली आहे. या पोस्टमध्ये कथोरे यांनी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आशिष दामले यांचे नाव घेत आपण त्यांच्या लसीकरण मोहीम यावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता असे स्पष्ट केले आहे. या पोस्टमध्ये ‘लेकी बोले सुने लगे’ असा संदर्भ देत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना पुन्हा टार्गेट करण्यात आले आहे.
या पोस्टमध्ये कथोरे यांनी खुलासा करत आपण कोणत्याही राजकीय पक्षावर आरोप केलेला नव्हता. समाज माध्यमांवरचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. त्याचा संदर्भ घेऊन आपण नागरिकांना सतर्क केले. यापुढे नागरिक लसीकरण करण्यासाठी गेल्यावर सतर्क राहून लस घेतील या भावनेतून आपण आवाहन केल्याचेही स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून एकमेकांवर आरोप करण्याचे शीतयुद्ध सध्या बदलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
-----------