भुयारी मार्गात प्रवाशांची घुसमट, अरुंद भुयारी मार्गात चेंगराचेंगरीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 05:20 IST2018-11-15T05:20:04+5:302018-11-15T05:20:32+5:30
जुना मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी : अरुंद भुयारी मार्गात चेंगराचेंगरीची शक्यता

भुयारी मार्गात प्रवाशांची घुसमट, अरुंद भुयारी मार्गात चेंगराचेंगरीची शक्यता
कसारा : कसारा रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेला भुयारी मार्ग अरुंद असून यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात घुसमट होते आहे. येथे प्रवाशांची चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई उपनगरीसेवेचे शेवटचे तसेच मुंबई-नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या कसारा रेल्वेस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मध्यवर्ती असलेल्या या स्थानकातून मुंबई, ठाणे, कल्याण, शिर्डी, नाशिक, वणी, अकोले, राजूर, संगमनेर, मालेगाव, धुळे, इगतपुरीसह आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी प्रवासी उतरतात, तर परतीच्या प्रवासासाठी हजारो प्रवासी दररोज येजा करत असतात. रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्यासाठी रेल्वेस्थानकाबाहेरच मोठ्या प्रमाणात भूखंडवजा मोकळा रस्ता होता. हा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद करून सुरक्षेचे कारण पुढे करत त्या रस्त्याला कम्पाउंड टाकले आणि प्रवाशांसाठी भुयारीमार्ग तयार केला. मात्र, हा मार्ग अतिशय अरुंद आणि असुरक्षित आहे.
कसारा रेल्वेस्थानकातील भुयारी मार्गात प्रवाशांची होणारी घुसमट तसेच असुरक्षितता लक्षात घेता संबंधित ठिकाणाची पाहणी करून उपाययोजना करण्यात येईल.
- उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी
कसारा रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्यासाठी हा भुयारी मार्ग धोकादायक आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत जुना रस्ता मोकळा करावा.
- राजेश घनघाव, अध्यक्ष, के-३ प्रवासी संघटना
प्रवाशांसाठी पर्यायी मार्गाची गरज
च्या मार्गात प्रवाशांची घुसमट होते. तर, गर्दीचा लोट असल्याने भुयारी मार्गात वयोवृद्ध, लहान मुले तसेच महिलांनादेखील त्रास होतो. या भुयारी मार्गात गर्दीच्या वेळी आंबटशौकीन तसेच गर्दुल्ले महिला प्रवाशांची छेड काढतात.
च्कळतनकळत होत असलेल्या या छेडछाडीबद्दल काही महिलांनी रेल्वे हेल्पलाइनवर तक्रारी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. दरम्यान, रेल्वेस्थानकातील प्रवासी संख्या लक्षात घेता तसेच सुटी काळात होत असलेल्या गर्दीचा अंदाज घेता प्रवाशांसाठी पर्यायी उपाययोजना न केल्यास प्रवाशांची घुसमट होऊन चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.