शहरांपेक्षा ग्रामीण भागात पॉझिटिव्ह दर अत्यल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST2021-06-01T04:30:28+5:302021-06-01T04:30:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या शहरात ठिकठिकाणी आठ हजार ६६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या ...

शहरांपेक्षा ग्रामीण भागात पॉझिटिव्ह दर अत्यल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या शहरात ठिकठिकाणी आठ हजार ६६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या तुलनेत ग्रामीणच्या पाच तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नियंत्रणात एक हजार १७९ रुग्ण उपचाराखाली आहेत, तर आजपर्यंत शहरातील मृतांची संख्या सात हजार ७०९ (मृत्युदर १.७५ टक्के) झाली आहे. या तुलनेत ग्रामीण भागात ८८३ मृत्यू झाले असून, हा मृत्युदर २.४२ टक्के आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील शहरांमध्ये अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाच लाख १५ हजार ८४९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी शहरात चार लाख ३९ हजार ५४६ रुग्ण, तर ग्रामीण भागात ३६ हजार ४६३ रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी ग्रामीण भागात ३४ हजार ४०१ रुग्ण (९४.३४ टक्के) बरे झाले आहेत, तर शहरांमधील चार लाख २५ हजार १२ रुग्ण (९६.६९ टक्के) बरे झाले आहेत. दुसरीकडे दोन नगरपालिकांच्या हद्दीत ३९ हजार ८४० रुग्ण आढळले आहेत. महापालिका व नगरपालिकांच्या हद्दीलगतच्या ग्रामपंचायतींमध्ये रुग्ण वाढण्याचे प्रमाण आधीपासून दिसून येत आहे.
शहरांमध्ये आजपर्यंत सात हजार ७०९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर १.७५ टक्के नोंदवला गेला आहे, तर ग्रामीण भागात ८८३ रुग्ण दगावले असून, मृत्युदर २.४२ टक्के आहे. दोन नगरपालिकांच्या हद्दीत ६६१ मृत्यू झाले असून, मृत्युदर ७१.६६ टक्के आहे.
------------------
तालुका- प्राथमिक आरोग्य केंद्र-रुग्ण संख्या
अंबरनाथ- ४ - १२३
कल्याण- ३ - २७६
भिवंडी - ८ - ३३२
शहापूर- ९ -३८१
मुरबाड- ९- ६७
----------------
ग्रामीण भागांत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठ्या प्रमाणावर राबविल्या जात आहेत. आरोग्य यंत्रणा तैनात असल्याने रुग्णसंख्या कमी झाली आहे. एक हजार १८९ रुग्ण जिल्ह्यातील या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचार घेत आहे.
- डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे
-----------