आयोगाची मतदानासाठी कडेकोट नाकाबंदी
By Admin | Updated: June 2, 2016 01:23 IST2016-06-02T01:23:25+5:302016-06-02T01:23:25+5:30
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक नगरसेवकाला मतदानाच्यावेळी मतपत्रिकेवरील क्रमांक लिहून आणण्याचे आदेश दिले होते.

आयोगाची मतदानासाठी कडेकोट नाकाबंदी
पंकज पाटील, बदलापूर
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक नगरसेवकाला मतदानाच्यावेळी मतपत्रिकेवरील क्रमांक लिहून आणण्याचे आदेश दिले होते. मात्र, राजकीय पक्ष आपली मते फुटली किंवा कसे, यावर लक्ष ठेवण्याकरिता या क्रमांकाची माहिती मतदारांकडून घेत असल्याचा पूर्वानुभव असल्याने यावेळी मतपत्रिकेवर मतपत्रिकेचा क्रमांक दिसणार नाही, असा बंदोबस्त आयोगाने केला आहे. यामुळे घोडेबाजार करणाऱ्या राजकीय पक्षांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
या निवडणुकीकरिता ३ जून रोजी १३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापूर्वी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतपत्रिकेवरील अनुक्रमांक लिहून पक्षाच्या उमेदवाराकडे देण्याचे बंधन राजकीय पक्ष घालत होते. त्यामुळे कुठल्या अनुक्रमांकाची मतपत्रिका कुणाची असून ते मत आपल्याला मिळाले आहे किंवा कसे, हे उमेदवाराला निकालानंतर कळत होते. परिणामी, गुप्त मतदान पद्धतीला हरताळ फासला जात होता. याच तंत्राचा वापर यावेळीही शिवसेना-भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जाणार होता. होता. मात्र, आयोगाच्या नाकाबंदीमुळे राजकीय पक्षांचे हे मनसुबे धुळीस मिळाले. मतपत्रिका बाहेर नेण्यास बंदी : निवडणुकीसाठी देण्यात येणारी मतपत्रिका लपवून बाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक मतदारास मतपत्रिका मतपेटीत टाकणे बंधनकारक केले आहे. मतपेटीत मतमोजणीच्यावेळी कोरे कागद सापडतात. ज्या नगरसेवकांवर संशय असतो, त्यांचा गट केला जातो. त्यामधील पहिला नगरसेवक मतपेटीत कोरा कागद टाकतो व मतपत्रिका बाहेर आणून ती मतदान करून पुढील नगरसेवकांला देतो. तो नगरसेवक त्याची मतपत्रिका मत देऊन बाहेर आणतो व दाखवून दुसऱ्याला देतो. या प्रथेला त्यामुळे आळा बसेल.
मोबाइल नेण्यास मनाई
‘मतपत्रिकेवरील अनुक्रमांकाबाबतची तक्रार आपण निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर, निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरात मतपत्रिकेवरील अनुक्रमांक मतदाराला दिसणार नाही, असा उल्लेख आहे.’
- कॅप्टन आशीष दामले, नगरसेवक, बदलापूरमतदान केल्यावर मतपत्रिकेचे फोटो काढण्याची शक्यता असल्याने आणि मतदान करताना मोबाइलने शूटिंग केले जाण्याची शक्यता असल्याने मतदान केंद्रात मोबाइल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोबाइल बाहेर जमा करूनच मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्याच
पेनचा वापर बंधनकारक
निवडणुकीत उमेदवाराला मतदान करताना त्याच्या नावापुढे ‘१’ अंक लिहावा लागणार आहे. मात्र, हा क्रमांक लिहिण्याकरिता नगरसेवकांना स्वत:चे पेन वापरता येणार नाही. निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या पेनचाच वापर करावा लागणार आहे. राजकीय पक्ष हे मतदारांना वेगवेगळ्या रंगाची शाई असलेले पेन देत होते. पाच ते सात नगरसेवकांना गट करून त्यांना तेवढ्या रंगाची शाई असलेले पेन देऊन मतदान केले जायचे. त्या गटात कुणाला कुठल्या रंगाचे पेन दिले आहे, हे उमेदवार अगोदरच नोंदवत असल्याने फुटीचा संशय असलेल्या नगरसेवकांचे मत पडले की नाही, ते कळत होते. कुठल्या कंपनीचे कुठल्या रंगाचे पेन वापरले जाणार, तेही आयोगाने स्पष्ट केलेले नाही.