ठाणे : पडदे, कार्पेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ यांच्या साहाय्याने व एकसारख्या रंगांच्या कपड्यांनी महिला, युवा व दिव्यांग मतदान केंद्रे सजणार आहेत.गुलाबी रंगाने महिला, पिवळ्या रंगाने युवा, तर आकाशी निळ्या रंगाने दिव्यांग मतदान केंद्रे तयार केली आहेत. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे १८ केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या केंद्रासाठी गुलाबी रंग ठरविण्यात आला. महिला मतदान केंद्रामध्ये पडदे, कार्पेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार, तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व महिला कर्मचारी यांनी गुलाबी रंगाची वस्त्रे परिधान केलेली असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या महिलांचे फोटो लावण्यात येणार आहेत.
युवा मतदान केंद्रांवर युवा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. या केंद्रासाठी पिवळा रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये युवा यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्रज्ञ, यांचे फोटो लावण्यात येतील.
कर्मचारी कोळी वेशभूषेतभिवंडी ग्रामीण मतदारसंघामधील सारंग गावातील मतदान केंद्र क्र. ३२१ मध्ये ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात येणार आहे. यासाठी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, मासे विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या, बोट, रांगोळी यांचा वापर केला जाणार आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी हे कोळी वेशभूषेत असतील.
दिव्यांगासाठीही केंद्रठाणे जिल्ह्यातील १७ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे १७ केंद्रांवर दिव्यांग कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या केंद्रासाठी आकाशी निळा रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कार्पेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, प्रवेशद्वार, तसेच नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी आकाशी रंगाचे कपडे परिधान केलेले असतील.
मतदान केंद्राच्या मंडपामध्ये भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या दिव्यांग यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्र, अभिनेता, लेखक यांचे फोटो लावण्यात येणार आहेत.