Politics heated up in Mira Bhayander when lockdown growth had not yet taken place | CoronaVirus News: मीरा- भाईंदरमध्ये लॉकडाऊन वाढ अजून झाली नसतानाच राजकारण तापले

CoronaVirus News: मीरा- भाईंदरमध्ये लॉकडाऊन वाढ अजून झाली नसतानाच राजकारण तापले

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वाढवण्यात आलेल्या लॉक डाऊनची मुदत 18 जुलैला संपणार असून लॉक डाऊन वाढवण्याचा कोणताच निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला नसताना शहरातील राजकारण्यांनी मात्र आता पासूनच लॉक डाऊन वरून बोंबाबोंब करत विविध इशारे देत शहरातील वातावरण तापवण्यास सुरवात केली आहे . 

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घालत सर्वांनाच हतबल करून टाकले असून मार्च पासून चालवण्यात आलेल्या लॉक डाऊन नंतर देखील कोरोना पूर्णपणे रोखणे शक्य झालेले नाही . लॉक डाऊन मुळे कोरोना पसरण्यावर काही प्रमाणात नियंत्रण आले असले तरी लॉक डाऊन आता पर्याय राहिलेला नाही . 

मुळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क घालणे , गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग ठेवणे , हात स्वच्छ धुतल्याशिवाय नाक - तोंडाला स्पर्श न करणे व कोरोना बाधित आणि संशियतांनी वेळीच  वेगळे करून उपचार घेणे हे प्रभावी उपाय आवश्यक असताना त्याचे पालन मात्र केले जात नाही . त्यामुळेच कोरोनाचे रुग्ण आणि बळी वाढत चालले आहेत असे जाणकारांचे  आहे . 

परंतु बहुतांश लोकप्रतिनिधी , राजकारणी मात्र संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्यासह निर्देशांचे होणारे उल्लंघन रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलत नाहीत . त्या ऐवजी आरोप प्रत्यारोप व राजकारण करण्यासह एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यातच धन्यता मानत आहेत. 

आमदार गीता जैन यांनी तर लॉक डाऊन पुन्हा वाढवल्यास जेलभरो आंदोलन करू असे इशारा दिला आहे . मनसे ने देखील निवेदन देऊन विरोध केला आहे . संदीप राणे यांच्या रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय .  खाजगी संस्थेच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय होऊ पाहणारे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी देखील इशारा दिला आहे . या शिवाय काहींनी लॉक डाऊन वाढवू नये यासाठी निवेदने दिली आहेत . 

  वास्तविक 10 जुलै रोजी पर्यंत लॉक डाऊन असताना महापौर ज्योत्स्ना हसनाळे सह पालिका पदाधिकारी व आयुक्त डॉ . विजय राठोड यांची बैठक झाली होती . त्यावेळी महापौरांसह भाजपा , शिवसेना , कोंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लॉक डाऊन वाढवू नका अशी भूमिका घेतली होती . आयुक्तांनी देखील तयारी दर्शवली असताना ठाणे आदी अन्य महापालिकांनी लॉक डाऊन वाढवल्याने मीरा भाईंदर मध्ये देखील 18 जुलै पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.   

कोरोनाच्या संसर्गकाळात राजकारण्यांचे इशारे पाहता शहरातील कायदा सुव्यवस्था व वातावरण बिघडण्याची शक्यता आहे . मुळात लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय अजून नसताना राजकीय चमकोगिरीसाठी असे बेजबाबदारपणाचे इशारे देणे निंदनीय असल्याचे आगरी समाज ऐकताचे पदाधिकारी ऍड. सुशांत पाटील म्हणाले . 

राजकारण्यांनी इशारे देण्या ऐवजी तळागाळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीचे दिशा निर्देश कसे काटेकोर पाळले जातील या साठी रस्त्यांवर व गल्लीबोळात उतरून काम करावे. हेच राजकारणी आमच्या इशाऱ्या मुळे लॉकडाऊन वाढवला नाही असे राजकीय श्रेय घेण्याचे डावपेच आखून आहेत असा टोला कृष्णा गुप्ता , रोहित सुवर्णा, प्रदीप जंगम, प्रदीप सामंत आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी लगावला आहे.

Web Title: Politics heated up in Mira Bhayander when lockdown growth had not yet taken place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.