मीरा भाईंदरला मंजूर १२५ दशलक्ष लीटर पाणी आटल्याने राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:52+5:302021-04-03T04:36:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये पाण्यावरून राजकारण चांगलेच तापायला लागले असून शहरातील पाणी समस्येवरून भाजपने राज्यातील महाविकास ...

मीरा भाईंदरला मंजूर १२५ दशलक्ष लीटर पाणी आटल्याने राजकारण तापले
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये पाण्यावरून राजकारण चांगलेच तापायला लागले असून शहरातील पाणी समस्येवरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडी शासनाला जबाबदार धरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिका निवडणुकीपुरते १२५ दशलक्ष पाणी देऊन भाजपने जनतेची फसवणूक केली, आता स्वतःची पापे झाकण्यासाठी भाजप कांगावा करीत असल्याचे प्रत्युत्तर शिवसेना व काँग्रेसने दिले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी अलीकडेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे शासनाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक मंडळाकडून १२५ दशलक्ष लीटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ३० दशलक्ष लीटर पाणी कमी मिळत आहे, असे जाहीर केले. पाण्याची टंचाई जाणवत असल्याने नगरसेवकांनी जनजागृती करावी, असे आवाहन खांबित यांनी केले.
शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन भाईंदर पूर्व भागात शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या भागात कमी पाणी सोडले जात असल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याचे सांगितले. सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे पाणीवाटपात भेदभाव केला जात आहे. भाजपच्या काही नगरसेवकांच्या प्रभागात जास्त पाणी सोडले जाते, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, गटनेत्या नीलम ढवण यांनी बुधवारी केला.
गुरुवारी भाजपचे उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृह नेते प्रशांत दळवी, स्थायी समिती सभापती दिनेश जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील पाणी समस्येला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शासन जबाबदार असल्याचा आरोप केला. शहरात दोन आमदार व खासदार असून शासनकडून कमी पाणी दिले जात आहे. पालिकेत भाजपची सत्ता असल्याने हेतूत: कमी पाणी दिले जात आहे. याच्या निषेधार्थ १२ एप्रिलपासून आयुक्त दालनाबाहेर धरणे धरू, असा इशारा भाजपने दिला.
भाजपच्या आरोपांवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत म्हणाले की, एमआयडीसीचे १२५ दशलक्ष लीटर पाणी काँग्रेस आघाडी शासन काळातच मंजूर झाले होते; परंतु आम्ही पाणी आणले व २४ तास पाणी देण्याचा खोटा प्रचार निवडणुकीत भाजपाने केला. निवडणुकीत भाजपचे नरेंद्र मेहतांना जनतेने पाणी पाजले आणि शहरात पाणीटंचाई सुरू झाली. महापौरांना एमआयडीसीने दिलेल्या पत्रातच ते १२५ दशलक्ष लीटर पाणी केवळ पावसाळ्यापुरते तात्पुरते होते असे स्पष्ट केले होते. यावरून भाजपाने निवडणुकीत मतांसाठी लोकांची फसवणूक केली, असा आरोप सामंत यांनी केला.
विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील म्हणाले की, एमआयडीसीकडून मिळणारे पाणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंजुरीमुळे शहराला मिळत आहे. वास्तविक उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होतो व त्याच्या नियोजनासाठी पाणीकपात यापूर्वीसुद्धा केली गेली आहे; परंतु शहरातील पाणी गळती रोखणे, समान पाणीवाटप करणे, अनधिकृत नळजोडण्या रोखणे, वितरण यंत्रणा सुधारणे यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी भाजपाने स्वतःची पापे झाकण्यासाठी हा कांगावा सुरू केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
सामाजिक संस्थेचे पदाधिकारी भगवान कौशिक म्हणाले की, महापालिकेने बिल्डरांच्या नवीन बांधकाम प्रकल्पांसह अनधिकृत बांधकामे आणि स्वतःच्या क्लब, इमारती आदी बांधकामांना नव्याने नळजोडण्या दिल्या. या नळजोडण्या हजारोंच्या संख्येने आहेत. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून आजची पाणीटंचाई सत्ताधारी भाजपने निर्माण केली आहे.
.............
वाचली