ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:42 IST2025-07-31T11:40:11+5:302025-07-31T11:42:13+5:30
माजी खासदार राजन विचारे यांच्याविरोधात लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे ठाण्यात गुरुवारी (३१ जुलै) राजकीय वातावरण चांगलेच तापले.

ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
ठाणे: माजी खासदार राजन विचारे यांच्याविरोधात लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे ठाण्यात गुरुवारी (३१ जुलै) राजकीय वातावरण चांगलेच तापले. हा बॅनर काढण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा सैनिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा आरोप केला.
बॅनरवरून राडा, पोलिसांशी झटापट
लुईसवाडी परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरवरून हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी बॅनर काढण्यास सुरुवात करताच शिंदे गटाच्या युवा सैनिकांनी तीव्र विरोध केला. बॅनर काढल्यानंतर त्यांनी राजन विचारे यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. पोलिसांनी काढलेला बॅनरही या कार्यकर्त्यांनी फाडून टाकला. यावेळी काही काळ पोलीस आणि शिंदे गटाच्या युवा सैनिकांमध्ये झटापट झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बॅनरबाजीवरून शिंदे-ठाकरे शिवसेनेत राडा, शिंदे गटाने लावलेले विरोधातील बॅनर राजन विचारेंच्या समर्थकांनी फाडले.
— Lokmat (@lokmat) July 31, 2025
(व्हिडीओ : विशाल हळदे)#Thane#Shivsenapic.twitter.com/e5aGTyne8Q
ठाकरे गटाची पत्रकार परिषद: शिंदे गटावर गंभीर आरोप
या सर्व प्रकारानंतर, ठाण्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवा सेनेने पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यात त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. "ठाणेकर आजही त्यांच्या समस्या घेऊन राजन विचारे यांच्याकडे येतात. आताचे खासदार कुठे आहेत, हे ठाणेकर शोधत आहेत. २००४ साली काँग्रेसमध्ये कोण जात होतं? त्यांना पुन्हा शिवसेनेत कोणी आणलं?" असा सवाल करत ठाकरे गटाने शिंदे गटावर निशाणा साधला.
ठाकरे गटाचा शिंदे गटावर हल्लाबोल
यावेळी ठाकरे गटाने शिंदे गटाला थेट आव्हान देत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. खासदारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह आणि मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा आरोप ठाकरे गटाने सध्याच्या खासदारांच्या कामावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "विद्यमान खासदारांनी अशी कोणती कामं केली, ज्यामुळे त्यांना 'संसदरत्न' पुरस्कार मिळाला, हे त्यांनी स्पष्ट करावं." तसेच, शिंदे गट महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देऊन इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला.
जुने संबंध आणि पक्षनिष्ठा यावर भर
ठाकरे गटाने जुन्या शिवसैनिकांच्या निष्ठेवरही प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, "नितीन लांडगे यांचा मातोश्रीवरील बाळासाहेबांसोबत आशीर्वाद घेतानाचा फोटो हा विचारे यांच्यामुळेच आहे. संसद भवन दाखवणारे देखील राजन विचारेच आहेत." पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले, "पक्षी दुसरे घरटे बनवतो, पण तो आईला मारायला येत नाही." तसेच, ठाण्याची युवासेना केवळ राजन विचारे यांच्यामुळेच टिकून असल्याचा दावा त्यांनी केला.
युवा सेनेच्या नेतृत्वावरूनही ठाकरे गटाने शिंदे गटाला लक्ष्य केले. "त्यांच्या युवा सेनेचे अध्यक्ष कोण आहे हे तरी माहिती आहे का? आमच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य उद्धव ठाकरे आहेत. युवा सेनेचे एकच अध्यक्ष म्हणून नाव येतं ते आदित्य उद्धव ठाकरे यांचंच." असे सांगत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
शेवटी, ठाकरे गटाने शिंदे गटाकडून होत असलेल्या टीकेच्या पातळीवर नाराजी व्यक्त केली. "लबाड लांडगा ढोंग करतोय, तिकिटासाठी सोंग करतोय," असे म्हणत त्यांनी टीका केली. "शिवसैनिक कधीच एवढ्या खालच्या पातळीवर टीका करत नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.