पोलिसांनी मिशन ऑलिम्पिक सुरू करावे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 12:16 IST2025-03-02T12:15:57+5:302025-03-02T12:16:47+5:30

राष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी फडणवीस बोलत होते.

police should start mission olympic said cm devendra fadnavis | पोलिसांनी मिशन ऑलिम्पिक सुरू करावे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलिसांनी मिशन ऑलिम्पिक सुरू करावे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : पोलिस दलात चांगले खेळाडू असून, पोलिसांनी मिशन ऑलिम्पिक सुरू करावे, म्हणजे २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पोलिस दलातील खेळाडूंचा समावेश होईल, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना केली.

महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री (शहर) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉ. संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे पोलिस दल हे देशातले सर्वोत्तम दल आहे. पोलिसांनी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखल्याने महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या नंबर १ चे राज्य झाले. संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलिस दलाची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. ही ओळख कायम टिकवण्यासाठी पोलिसांनी अधिक जबाबदारीने, अधिक पारदर्शकतेने काम करण्याची आवश्यकता आहे. जशी खेळात संघभावना जोपासली जाते, तशीच दैनंदिन कामकाजातही संघभावना जोपासायला हवी. असा सल्लाही त्यांनी दिला.

महिला पोलिसांसमोर कठीण आव्हाने

२०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत २५८८ खेळाडूंचा सहभाग होता, २०२४ मध्ये ३५०० खेळाडू होते आणि यावर्षी २९२९ खेळाडूंचा सहभाग आहे. ही संख्या कमी झाल्याची खंत व्यक्त करताना ही संख्या अधिक कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना केल्या.

यंदाच्या स्पर्धेत पुरुष खेळाडूंबरोबर महिला खेळाडूंच्या सहभागाबाबतही त्यांनी कौतुक केले. पोलिसांना अतिशय कठीण ड्युटी करावी लागते. महिला पोलिसांना तर अधिक कठीण आव्हानांना सामोरे जावे लागते. आपली ड्युटी करताना खेळाचे कौशल्य दुर्लक्षित होणार नाही. असा प्रयत्न महिला पोलिस करत असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: police should start mission olympic said cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.