भाईंदरच्या मुर्धा खाडीतील हातभट्टी उद्ध्वस्त; दीड लाखाची दारू नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 21:05 IST2018-11-27T21:01:35+5:302018-11-27T21:05:08+5:30
200 लिटरची क्षमता असलेले दारुचे 30 ड्रम जप्त

भाईंदरच्या मुर्धा खाडीतील हातभट्टी उद्ध्वस्त; दीड लाखाची दारू नष्ट
मीरारोड: भाईंदर पश्चिमेच्या मुर्धा खाडीतील हातभट्टी आज मंगळवारी उत्पादन शुल्क विभागाने उद्ध्वस्त केली. मात्र यामुळे हातभट्टी माफियांनी पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी डॉ महेश पाटील असताना हातभट्टी माफियांच्या विरोधात धडक मोहीम राबवण्यात आली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, सहाय्यक निरीक्षक सरोजना मोकलीकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह भाईंदर व उत्तन हद्दीत धडक कारवाई करून हातभट्टी माफियांचे कंबरडे मोडले होते. पण उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई मुळे हातभट्टी माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अभिजित देशमुख, दुय्यम निरीक्षक किरण पवार यांच्या पथकाने मुर्धा खाडीत छापा टाकला. सकाळी 8 वाजता ओहोटीचा अंदाज घेत बोटींने मोहीम सुरू करण्यात आली. सुमारे दोन किमी अंतर पार केल्यानंतर घनदाट कांदळवनात हातभट्टी लावण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी 200 लिटरची क्षमता असलेले दारुचे 30 ड्रम जप्त केले. याशिवाय 105 लिटर गावठी दारु नष्ट केली. छाप्याची माहिती मिळताच एक आरोपी पळून गेला. 1 लाख 42 हजार 520 रुपये किंमतीची दारू, मोठे भांडे आदी मुद्देमाल असल्याचे देशमुख म्हणाले.