कोरोना समुपदेशन समितीच्या अध्यक्षाचा पोलिसांनी घेतला जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:13+5:302021-04-30T04:51:13+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील कोरोना समुपदेश समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी नागरिकांना मदत, तर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी बुधवारी दुपारी एक ...

कोरोना समुपदेशन समितीच्या अध्यक्षाचा पोलिसांनी घेतला जबाब
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील कोरोना समुपदेश समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी नागरिकांना मदत, तर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी बुधवारी दुपारी एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. परंतु, ही पोस्ट नागरिकांना भडकविणारी आहे, अशी तक्रार केडीएमसी आयुक्तांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी काकडे यांचा लेखी जबाब घेतला आहे. त्यात त्यांनी आपला उद्देश स्वच्छ असल्याचे म्हटले आहे.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा प्रशासन व नागरिकांच्या मदतीसाठी काकडे यांनी कोरोना समुदेशन समिती स्थापन केली. वर्षभरात या समितीने कोरोनाबाबत जागृती तसेच नागरिक आणि प्रशासनाला मदत केली. सध्या सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाबाबत काकडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली की, ‘प्रत्येकाने लसीकरण केंद्रास भेट द्यावी. तेथे नागरिकांसाठी सावलीची काय व्यवस्था आहे. बसण्यासाठी पुरेशा खुर्च्या आहेत का, याची माहिती घ्यावी. तसेची ती माहिती समितीला द्यावी.’
मात्र, ही पोस्ट नागरिकांना भडकविणारी असल्याचे सांगत केडीएमसी आयुक्तांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यामुळे सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी काकडे यांना बोलावून घेत त्यांचा जबाब नोंदवून घेतला. या पोस्टद्वारे नागरिकांना भडकविण्याचा उद्देश नव्हता. समिती वर्षभरापासून नागरिक आणि प्रशासनाला मदत करीत आहे. लसीकरण केंद्रावर सावली नसल्यास मांडव आणि पुरेशा खुर्च्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही पोस्ट टाकल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, यातून प्रशासनाचा काही गैरसमज झाला असल्याने त्यांनी माफी मागितली आहे.
------------------------