पोलिसाकडून सहकारी महिलेचा विनयभंग, ठाणे न्यायालयाजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:36 IST2018-04-19T03:36:31+5:302018-04-19T03:36:31+5:30
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस शिपायाने मंगळवारी एका सहकारी महिला पोलिसाला ठाणे न्यायालयाजवळ अश्लील शिवीगाळ केली. महिलेच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलिसांनी त्या शिपायाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसाकडून सहकारी महिलेचा विनयभंग, ठाणे न्यायालयाजवळील घटना
ठाणे : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस शिपायाने मंगळवारी एका सहकारी महिला पोलिसाला ठाणे न्यायालयाजवळ अश्लील शिवीगाळ केली. महिलेच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलिसांनी त्या शिपायाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सरकारी वाहनामधून मंगळवारी काही आरोपींना ठाणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाची सुनावणी आटोपल्यानंतर, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सेंट्रल मैदानाच्या गेटसमोर पोलिसांची गाडी काही वेळासाठी उभी करण्यात आली होती. त्या वेळी किरण कांबळे हा पोलीस शिपाई गाडीजवळ उभा राहून नाश्ता करत होता. त्या वेळी एका आरोपीला तहान लागल्याने त्याने महिला शिपायाकडे पाणी मागितले. आरोपीला पाणी पिता यावे, यासाठी महिला शिपायाने कांबळे यांना आरोपीच्या हाताला लावलेली बेडी सैल करण्यास सांगितले. दोन वेळा सांगूनही कांबळे यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यांच्यात अश्लील शिवीगाळ झाल्याने वाद चिघळला.
कांबळे यांनी महिला शिपायाची कॉलर पकडून तिला गाडीतून खाली ओढले. कांबळे यांनी आपल्याला जबर मारहाण केल्याचा आरोप तक्रारदार महिला शिपायाने केला. महिला शिपायाने ठाणेनगर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर, रात्री साडेअकराच्या सुमारास पोलीस शिपाई कांबळे याच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- किरण कांबळे हा पोलीस शिपाई गाडीजवळ उभा राहून नाश्ता करत होता. महिला सहकाऱ्याने आरोपीसाठी त्याच्याकडे पाणी मागितले. दोनदा सांगूनही कांबळेने दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्या वेळी कांबळेने महिलेची कॉलर पकडून तिला गाडीतून खाली ओढले.