पाच जिल्ह्यांतून तडीपार केलेल्या गुंडाला ठाणे पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 23:27 IST2019-10-02T23:09:36+5:302019-10-02T23:27:23+5:30
ठाणे जिल्हा, मुंबई, मुंबई उपनगरे, रायगड आणि पालघर या पाच जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या संदीप राजनाथ उपाध्याय ऊर्फ छोटू (२१) या गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे.

खंडणीविरोधी पथकाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उल्हासनगर येथून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या संदीप राजनाथ उपाध्याय ऊर्फ छोटू (२१, रा. कमला नेहरूनगर, उल्हासनगर) या गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्यावर उल्हासनगर क्रमांक एक पोलीस ठाण्यात महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १४२ नुसार कारवाई केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून फरारी तसेच तडीपार झालेल्या गुंडांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथक उल्हासनगर भागात गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करीत असताना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केलेला संदीप उपाध्याय हा गुंड उल्हासनगर क्रमांक एक येथील कमला नेहरूनगरातील शिवसेना कार्यालयाजवळ फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. त्याआधारे या पथकाने ३० सप्टेंबर रोजी त्याला या भागातून ताब्यात घेतले. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला १९ नोव्हेंबर २०१८ रोजी उल्हासनगरचे तत्कालीन पोलीस उपायुक्त यांनी ठाणे जिल्हा, मुंबई, मुंबई उपनगरे, रायगड आणि पालघर या पाच जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याला तडीपार केलेले असतानाही तो याच भागात बिनधास्तपणे बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत होता. तो ठाणे जिल्ह्यात विनापरवानगी आल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली.