ठाण्यात ३५ व्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मद्यपी मजूराला अग्निशमन दलासह पाेलिसांनी वाचविले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 21:04 IST2025-11-05T21:03:18+5:302025-11-05T21:04:22+5:30
वेतन थकल्याचा केला हाेता दावा: वेतनाची रक्कम देण्याचे मान्य करीत आत्महत्येपासून केले परावृत्त

ठाण्यात ३५ व्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मद्यपी मजूराला अग्निशमन दलासह पाेलिसांनी वाचविले!
ठाणे: बांधकामाच्या साईटवरील ठेकेदाराने थकीत २२ हजारांचे वेतन न दिल्याने सतेंद्र कुमार गौंडा ( वय २७ ) या बांधकाम मजूराने दारुच्या नशेत कापूरबावडी येथील एका ३५ मजली इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या करण्याचा बुधवारी प्रयत्न केला. पाेलिस, अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला विश्वासात घेत त्याचे थकित वेतन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याची याठिकाणावरुन सुखरुप सुटका केल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी दिली.
कापूरबावडी भागातील लोढा अमारा या बांधकाम साईटवर सतेंद्र मजूरीचे काम करताे. त्याला दारुचेही व्यसन आहे. त्याचा काही दिवसांचा पगार थकल्याचा दावा करीत त्याने याच पगाराच्या मागणीसाठी बांधकाम सुरु असलेल्या तळ अधिक ३५ मजली इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर चढून बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आत्महत्येचा इशारा दिला. त्याच्या या इशाऱ्यामुळे त्याच्या सहकारी कामगारांसह ठेकेदाराचीही तारांबळ उडाली. कामगारांनी ही माहिती कापूरबावडी पाेलिसांना दिली.
त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही तसेच लोढा अमारा सेफ्टी डिपार्टमेंटचे कर्मचारी तातडीने दाखल झाले. सतेंद्र याला बाेलण्यात गुंतवून विश्वासात घेतले. त्याच्या थकित वेतनाची मागणीही पूर्ण करण्यात येत असल्याचा विश्वास त्याला देण्यात आला. त्याला आत्महत्येपासून परावृत्त करुन सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर त्याची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सतेंद्र याचे काेणतेही वेतन थकले नव्हते. त्याला दारुचे व्यसन असल्याने त्यासाठीच ताे पैशांची मागणी करीत असल्याचा दावा संबंधित ठेकेदाराने केला. मात्र, त्याची समजूत काढण्यासाठी त्याचे वेतनही देण्याचेही संबंधित ठेकेदाराने मान्य केल्याची माहिती कापूरबावडी ठाण्याचे पाेलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी दिली.