डोंबिवली शहरात प्लास्टिक कचरामुक्त मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:31 IST2018-01-18T00:31:32+5:302018-01-18T00:31:46+5:30
कचरामुक्तीसाठी प्रयत्न करणाºया अपर्णा कवी यांच्या पुढाकाराने व इनरव्हील क्लबतर्फे प्लास्टिक कचरामुक्त मोहीम राबवली जात आहे

डोंबिवली शहरात प्लास्टिक कचरामुक्त मोहीम
डोंबिवली : कचरामुक्तीसाठी प्रयत्न करणाºया अपर्णा कवी यांच्या पुढाकाराने व इनरव्हील क्लबतर्फे प्लास्टिक कचरामुक्त मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत सर्व प्रकारचा प्लास्टिकचा कचरा रविवार, २१ जानेवारीला एमआयडीसीतील ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी १० ते १२ दरम्यान स्वीकारला जाणार आहे. त्यात २५ स्वयंसेवक व चार संस्थाही कार्यरत आहेत.
इनरव्हील क्लबबरोबर रोटरी, रोटरॅक्ट व डोंबिवली मिलापनगर असोसिएशनही या उपक्रमात सहभागी होणार आहे. यापूर्वीही त्यांनी राबवलेल्या उपक्रमात त्यांनी ३८ किलो ई-कचरा, ४३ किलो प्लास्टिकचा कचरा आणि ९ ते १० थर्माकोलच्या शीट मिळाल्या होत्या. या उपक्रमासाठी कवी यांना ओंकार इंटरनॅशनल शाळेत एक जागा मिळाली आहे. या वेळीस ई-कचरा, प्लास्टिक, थर्माकोल, कपडे, चप्पल, बूट आदी कचरा स्वीकारला जाणार आहे.
डोंबिवलीतील ऊर्जा फाउंडेशनही प्लास्टिकमुक्तीसाठी कार्यरत आहे. मात्र, त्यांचे कार्य शहरापुरते मर्यादित आहे. त्यामुळे डोंबिवली औद्योगिक वसाहतीत कवी यांनी आपले कार्य सुरू केले आहे. त्याला चार संस्थांची प्रबळ साथ मिळाली. सुरुवातीला २१ स्वयंसेवक होते. रविवारच्या मोहिमेत २५ स्वयंसेवक सहभागी होतील, असा दावा कवी यांनी केला आहे.
दर ३० दिवसांनी मोहीम
ऊर्जा फाउंडेशन दर ४० दिवसांनी प्लास्टिक कचरा गोळा करते, तर कवी यांच्यातर्फे चार संस्था या दर ३० दिवसांनी ही मोहीम राबवणार आहेत. तसेच आठवड्यातील प्रत्येक गुरुवार हा सुक्या कचºयासाठी ठरवून दिला जाणार आहे. ओल्या कचºयासाठी आठवड्यातील इतर दिवस ठरवले जाणार आहेत. कल्याण-डोंबिवी महापालिकेने या उपक्रमाला हातभार लावणे गरजेचे आहे. मात्र, महापालिका पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याचे कारण देते. परंतु, त्याचा सहभाग मिळाल्यास ही मोहीम अधिक प्रभावी होऊ शकते, असा दावा कवी यांनी केला आहे.
पहिल्या मोहिमेला ४८ नागरिकांनी प्रतिसाद दिला होता. आता रविवारी, २१ जानेवारीला हा प्रतिसाद अधिक संख्येने वाढण्याची शक्यता आयोजकांनी केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या इतर प्रभागांतही अशी मोहीम घेण्याचा मानस कवी व चारही संस्थांनी व्यक्त केला आहे.