The pits in the KDMC boundary are relatively deep; The engineer broke the strings of Akle | केडीएमसीच्या हद्दीतील खड्डे तुलनेत कमी खोल; अभियंत्याने तोडले अकलेचे तारे
केडीएमसीच्या हद्दीतील खड्डे तुलनेत कमी खोल; अभियंत्याने तोडले अकलेचे तारे

कल्याण : कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांप्रकरणी सामान्य नागरिकांमध्ये महापालिकेविरोधात संतापाची तीव्र भावना आहे. मात्र, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांनी महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे हे कमी खोलीचे असून, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यांवरील खड्डे हे जास्त खोल असल्याची माहिती दिली. शेळके यांनी अकलेचे तारे तोडल्याने स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. खड्डे त्वरित बुजवा, अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच खड्डे बुजविण्यात दिरंगाई करणाºया कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात येईल, असा सज्जड इशाराही दिला आहे.

स्थायी समितीत खड्ड्यांचा विषय चर्चेला आला असता शेळके यांनी खड्डे बुजविण्यापेक्षा कोणाच्या हद्दीत किती खोल खड्डे आहेत, याचे मोजमाप सांगण्यात धन्यता मानली आहे. कल्याण-डोंबिवलीतील काही रस्ते महापालिका हद्दीत, तर काही रस्ते राज्य रस्ते विकास महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत येतात. कल्याण-शीळ रस्ता हा कल्याण शहरातून जातो. परंतु, या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाची आहे. कल्याण-मुरबाड रस्ता व कल्याण-खंबाळपाडा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतो. डोंबिवली औद्योगिक परिसरातील रस्ते हे औद्योगिक विकास महामंडळांतर्गत येतात. गतवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही तत्कालीन शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी पाच जणांचा मृत्यू हा महापालिका हद्दीतील रस्त्यांवर झालेला नाही, असा खुलासा करीत जबाबदारी झटकण्याचा प्रकार केला होता. त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढून हद्द कोणाची, हे पाहत बसणार आहात का? लोकांचा जीव जात असताना हद्द न पाहता खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करणे महत्त्वाचे आहे, अशी सूचना केली होती. मात्र, यातून महापालिका अधिकाऱ्यांनी कोणताच धडा घेतलेला नाही, हे शेळके यांच्या विधानामुळे स्पष्ट होते.

रस्त्यांवर किती खड्डे आहेत, कोणते रस्ते खड्डेमय झाले आहे, खड्डे बुजविले गेले की नाही, आतापर्यंत किती खड्डे बुजविले आहेत, याचा तपशील शेळके यांनी देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ही माहिती न देता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हद्दीतील खड्डे हे जास्त खोलीचे आहेत, असे सांगून आपण कसे सुरक्षित आहोत, हे भासविण्याचा प्रयत्न केला. कमी खोलीचे खड्डे आहेत, असा दावा केला जात असला तरी रस्त्यांवर खड्डे आहेत. ते बुजविणार कधी, हा मूळ मुद्दा आहे, याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यांवरील खड्डे कंत्राटदार बुजवितो की नाही, यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी अशा प्रकारचे वक्तव्य करून सदस्यांना चिथावण्याचेच काम केल्याचे बोलले जात आहे.

नवरात्रीपूर्वी तरी खड्डे बुजवणार का?
गणपती आगमनापूर्वी खड्डे बुजविले जाणे अपेक्षित होते. मात्र, खड्डे बुजविले गेले नसल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यांतूनच झाले. त्यानंतर दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकाही खड्डेमय रस्त्यांतून निघाल्या. आता नवरात्रीपूर्वी तरी खड्डे बुजविले जाणार आहेत का, असा संतप्त सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: The pits in the KDMC boundary are relatively deep; The engineer broke the strings of Akle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.