खड्ड्यांमुळे होताहेत हाल; कल्याण-डोंबिवलीतील वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:41 IST2020-08-14T00:40:53+5:302020-08-14T00:41:03+5:30
वाहतुकीचा मंदावला वेग; नोकरदार त्रस्त

खड्ड्यांमुळे होताहेत हाल; कल्याण-डोंबिवलीतील वास्तव
कल्याण : मिशन बिगेन अगेनमुळे आता कुठे रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. मात्र, पावसामुळे खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. खड्डे तातडीने बुजवावेत, यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही मागणी करत असल्याने भरपावसात खड्डे बुजवण्याचे काम के ले जात आहे. पावसाने उघडीप घेतल्यावर खड्डे बुजवण्यात सातत्य हवे, याकडे नागरिक व वाहनचालकांनी लक्ष वेधले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने लोकलसेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिवहनसेवेच्या बस, रिक्षा, टॅक्सी, स्वत:ची दुचाकी, चारचाकी घेऊन नोकरदारवर्ग मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कर्जत, कसारा, भिवंडी, ठाणे व मीरा-भार्इंदरपर्यंत प्रवास करीत आहे. तेथे जाण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना शीळ-कल्याण-भिवंडी या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. मात्र, या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच, या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.
शीळ ते कोनगावदरम्यान बऱ्यापैकी काम झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधणे, मधल्या दोन लेनचे काम सुरू करणे, अशी कामे सुरू आहेत. तर, काही ठिकाणी हे काम झाले आहे. मात्र, काही ठिकाणी आजही डांबरी रस्ता अस्तित्वात आहे. या रस्त्यावरील दोन टोलनाक्यांवर जड, अवजड वाहनांकडून टोलवसुली केली जाते. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्याची डागडुजी केली जात नाही, अशी वाहनचालकांची तक्रार आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नोकरदारांना मुंबई, ठाणे, पनवेल गाठणे कठीण होते. दररोज त्यांना दोन तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. काही वेळेस चार तासांचा वेळही खर्च होतो. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारीच या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. यापूर्वी मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही या रस्त्याची पाहणी केली होती. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने सध्या भरपावसात खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे.
कल्याण-शीळ रस्त्यावरील पत्रीपुलाशेजारील पुलावर दोन आठवड्यांपूर्वी खड्डे पडले होते. तेथे माती टाकून खड्डे बुजवल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रशासनाने तेथील खड्डे बुजवले होते. मात्र, सध्या पडणाºया पावसामुळे पुन्हा पुलावर खड्डे पडले आहेत.
डोंबिवली एमआयडीसी परिसर, मानपाडा रस्त्यावर काही ठिकाणी तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडलेले आहेत. एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण झाली असून, त्याकडे एमआयडीसी व के डीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. खड्डे त्वरित बुजविले जातील, असे आश्वासन महापालिका व एमआयडीसीकडून दिले जात आहे. कल्याण पूर्व-पश्चिमेतील डांबरी रस्त्यांवरही खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट आहे.
केडीएमसीने खड्डे बुजवण्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मागच्या वर्षीही १७ कोटी खर्च झाले होते. मात्र, किती खड्डे बुजविले, याचा हिशेब मनपाने अद्याप दिलेला नाही. दरवर्षी खड्डे बुजविण्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. असे असतानाही नागरिकांना पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांतून प्रवास करावा लागतो. प्रसंगी अपघाताला तोंड द्यावे लागते. काही वेळेस जीव गमाविण्याची वेळ येते.
२७ गावांतील रस्त्यांची कामे रखडली
मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली होती. त्यात २७ गावांतील रस्ते वाहून गेले होते. त्यामुळे तेथील रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे ३२७ कोटी रुपये मागितले होते. मात्र, तेही सरकारकडून प्राप्त झाले नाही. राज्यात सत्तांतर झाल्यावरही या मागणीचा विचार झालेला नाही.
आता तर २७ पैकी १८ गावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना आयुक्तांनी १८ गावांतील विकासकामे स्थगित केली आहेत. त्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेचा विषय मार्गी लागून नवी नगर परिषद स्थापन होत नाही, तोपर्यंत रस्ते विकास होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.