अन्यायकारक वीजबिल दरवाढीविरोधात सोमैय्या, निरंजन डावखरे यांची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:25 PM2020-07-31T16:25:07+5:302020-07-31T16:25:14+5:30

राज्य सरकार व महावितरणाविरोधात तक्रार करून दरवाढ तातडीने रद्द करून लॉकडाऊनच्या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याची मागणी केली आहे.

Petition of Somaiya, Niranjan Davkhare against unjust electricity bill hike | अन्यायकारक वीजबिल दरवाढीविरोधात सोमैय्या, निरंजन डावखरे यांची याचिका

अन्यायकारक वीजबिल दरवाढीविरोधात सोमैय्या, निरंजन डावखरे यांची याचिका

Next

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीने केलेल्या अन्यायकारक वीजबिल दरवाढीविरोधात भाजपाचे ठाणे प्रभारी किरीट सोमैय्या, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य सरकार व महावितरणाविरोधात तक्रार करून दरवाढ तातडीने रद्द करून लॉकडाऊनच्या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याची मागणी केली आहे.

भाजपाच्या ठाण्यातील जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमैय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी ही माहिती दिली. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना आलेल्या भरमसाठ वीज बिलांकडे याचिकेद्वारे आयोगाचे लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक ग्राहकांना सरासरी बिलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले पाठवण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद असताना शेकडो युनिटचा वापर केल्याबद्दल ग्राहकांना बिल पाठवण्यात आले. तर घरगुती ग्राहकांनाही अशाच पद्धतीने चुकीची बिले पाठविण्यात आली आहेत. सामान्य माणसाला ही भरमसाठ वीज बिले भरणे शक्य नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी, लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले भरण्यासाठी ६ महिने मुदतवाढ द्यावी, या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी आदी मागण्या याचिकेद्वारे राज्य वीज नियामक आयोगापुढे करण्यात आल्या आहेत. 
ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या अवाजवी वीज बिलांची फेरतपासणी करावी, बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यास स्थगिती द्यावी, १०० युनिटपर्यंत मोफत वीज व ३०० युनिटपर्यंत वीजवापर झालेल्या कुटुंबांना ५० टक्के सवलतीच्या दराने वीज द्यावी, २५ टक्क्यांहून जास्त विजेचा वापर झालेल्या वीजबिलांच्या वसुलीलाही स्थगिती द्यावी आदी मागण्या याचिकेत नमूद करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य करण्यासंदर्भात राज्य सरकार व महावितरण कंपनीला आदेश द्यावेत, अशी विनंती किरीट सोमैय्या आणि आमदार डावखरे यांनी वीज नियामक आयोगाला केली आहे. त्याचबरोबर अवाजवी बिलांच्या प्रतीही आयोगाकडे सादर केल्या आहेत.
उत्पन्न बंद, पण वीजबिल वाढले : निरंजन डावखरे
लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट व छोट्या नोकऱ्या करणाऱ्यांचा रोजगार बुडाला. व्यावसायिकांचे व्यवसाय बंद झाला. मात्र, वीजबिल प्रचंड वाढले, हा प्रकार संतापजनक आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली. ------------------
जादा बिलबिलांच्या तक्रारी
व्हॉट्स अॅपवर पाठविण्याचे आवाहन
ठाणे महापालिका क्षेत्रातील हजारो नागरिकांना जादा वीजबिले पाठविण्यात आली आहेत. या बिलांची छायाचित्रे व आपली तक्रार श्री. धनंजय थिटे यांच्या ९९२०७८१६२६ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर पाठवावी. ग्राहकांच्या तक्रारी महावितरण कंपनीकडे पोचवून न्याय मिळवून दिला जाईल, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.

Web Title: Petition of Somaiya, Niranjan Davkhare against unjust electricity bill hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.