साहित्यिकांना मानधन द्यावे किंवा फक्त प्रवासखर्च?
By Admin | Updated: October 12, 2016 04:38 IST2016-10-12T04:38:00+5:302016-10-12T04:38:00+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साधेपणाने साजरे करायचे असल्यास साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, असा मुद्दा

साहित्यिकांना मानधन द्यावे किंवा फक्त प्रवासखर्च?
जान्हवी मोर्ये / डोंबिवली
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साधेपणाने साजरे करायचे असल्यास साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, असा मुद्दा चर्चेला आला आहे.डोंबिवलीत होणारे ९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन प्रवासाच्या दृष्टीने मुंबई, पुणे व नाशिकहून येणाऱ्या साहित्यिकांसाठी सोयीचे असणार आहे. त्यामुळे साधेपणाने संमेलन साजरे करण्याकरिता विविध परिसंवाद, कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या साहित्यिकांनी मानधन किंवा प्रवास खर्च, यापैकी एकच स्वीकारावे, अशी अपेक्षा साहित्यवर्तुळातून वारंवार केली जात जाते. मात्र, आयोजक त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. संमेलन साधेपणाने करण्यासाठी त्याच्या खर्चावर कात्री लावणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यिकांना मानधन किंवा प्रवास खर्च द्यावा, असा मुद्दा आता पुढे आला आहे.
याविषयी प्रवचनकार, व्याख्याते आणि प्रसिद्ध लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले की, स्थानिक पातळीवरील साहित्यिकांनी मानधन घेऊ नये. लांबून येणाऱ्या साहित्यिकांना प्रवासखर्च दिला जावा. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येणे बंद करावे. राजकारणी संमेलनात आले की, त्यांच्याकडून अपेक्षा वाढतात. संमेलन निखळ वातावरणात पार पडत नाही. राजकारण्यांशिवाय संमेलन पार पाडण्याची आयोजिकांची इच्छाशक्ती आहे का, हा मूळ प्रश्न आहे. लाखो रुपये संमेलनावर खर्च केले जातात. त्यातून काही बोध घेतला जात नाही. कृती करणारी चर्चा घडली पाहिजे, असे माझे प्रामाणिक मत आहे.
मराठी व हिंदी साहित्याच्या अभ्यासक व साहित्यिक डॉ. सुलभा कोरे यांनी सांगितले की, ‘साहित्यलेखन हा बऱ्याच साहित्यिकांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. मानधन त्यांना दिले जाते. ते फार मोठ्या रकमेचे नसते. मानधन हा त्यांचा एक सन्मान असतो. आपल्याकडे फुकट काही दिले, तर त्याची काही किंमत राहत नाही. साहित्यिक फुकटात आले, तर त्यांचीही किंमत राहणार नाही. काही न घेता ते संमेलनात उपस्थित राहिल्यास त्यांची किंमत राहणार नाही. मानधन दिले जावे. त्यातूनही एखाद्या साहित्यिकाने मानधन घेणे नाकारले, तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल. त्याचे स्वागतच केले जाईल. संमेलनात साहित्यिक काही पैसा मोजायला जात नाही. पण, त्याला मानधन न देता बोलावण्याचा चुकीचा पायंडा पाडता कामा नये. मानधन दिले नाही, तर त्याला येण्याजाण्याचा प्रवासखर्च तरी दिला जावा, असे मला वाटते.’