उपचाराविना रुग्णाचा उल्हासनगरमध्ये मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 00:20 IST2020-06-27T00:20:25+5:302020-06-27T00:20:48+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहण-या ५७ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी रात्री श्वसनाचा त्रास सुरु झाला.

उपचाराविना रुग्णाचा उल्हासनगरमध्ये मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप
उल्हासनगर : श्वसनाचा त्रास होणाऱ्या एका रुग्णाचा उपचाराविना बुधवारी मृत्यू झाला. तीन तास शहरात फिरून नामांकित रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहण-या ५७ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी रात्री श्वसनाचा त्रास सुरु झाला. ओळखीच्या डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला मुलाला व कुटुंबाला दिला. डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी घेऊन मुलगा शहरातील नामांकित रुग्णालयात गेला. मात्र, रुग्णालयाने बेड नसल्याचे सांगून उपचारास नकार दिला. अखेर, एका मित्राच्या ओळखीने बुधवारी सकाळी डोंबिवलीच्या एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे काही वेळ उपचार केल्यावर, रुग्णालयाने बेड रिकामा नसल्याचे सांगून उल्हासनगरमध्ये परत पाठवले. वाटेतच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. मृतदेह घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात गेले असता, कोणतीही चाचणी न करता रुग्णालयाने कोरोना संशयित म्हणून जाहीर करून तसे प्रमाणपत्र दिले. मृतदेह परस्पर स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करावे लागल्याची माहिती त्या रुग्णाच्या मुलाने पत्रकारांना दिली. अशी वेळ इतरांवर येऊ नये, असे या मुलाने सांगितले. रुग्णालयात संशयित रुग्णावर उपचार झाल्यास अनेकांचे प्राण वाचतील. अचानक श्वसनाचा त्रास झाल्यावर उपचारासाठी रुग्णालयात नेल्यावर, रुग्णालय सुरुवातीला कोरोनाचा अहवाल मागतात. मुळात कोरोनाचा अहवाल लगेच मिळतो का? अहवाल नसल्याने उपचार केले जात नसल्याने अनेकांचे बळी जात आहेत.
>रेडक्रॉस रुग्णालयातही सावळागोंधळ कायम
या घटनेबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संबंधित रुग्णाला रेडक्रॉस रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जायला हवे होते. मात्र, प्रत्यक्षात या रुग्णालयात अपुरी सुविधा व सावळागोंधळ असून, याविरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी दिला आहे.