भिवंडीत धोकादायक घराचा भाग कोसळला; दोन नागरिकांची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 17:12 IST2021-07-27T17:11:22+5:302021-07-27T17:12:21+5:30
Bhiwandi : गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झाड व धोकादायक भिंत, झोपडी अन्य काही वस्तू पडण्याच्या घटना घडत आहेत.

भिवंडीत धोकादायक घराचा भाग कोसळला; दोन नागरिकांची सुखरूप सुटका
- नितिन पंडीत
भिवंडी : भिवंडी शहरातील वाणी आळी, झेंडा नाका परिसरात असलेले एक धोकादायक घर मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक झालेल्या या दुर्घटनेत घरातील दोघांची (पुरुष व महिला) अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. या दुर्घटनेमुळे घरातील राहिवाशांबरोबरच परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.
गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झाड व धोकादायक भिंत, झोपडी अन्य काही वस्तू पडण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू असताना वाणी आळी झेंडा नाका चौक भागात येथे राहत असलेले मुरलीधर काळे यांचे जुने धोकादायक घराचा मागील काही भाग अचानकपणे कोसळला त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी महापालिका व अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घरात अडकून पडलेल्या काळे कुटुबातील मुरलीधर काळे ( वय ७५ वर्ष ) व सुनीता काळे ( वय ५० ) या दोघांना सुरक्षित बाहेर काढून धोकादायक इमारतीच्या घराचा भाग काढून टाकला.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भिवंडी मनपा या दुर्घटनेतून काही बोध घेऊन शहरातील धोकादायक इमारतींमधील राहणाऱ्या नागरिकांना घरे खाली करण्यास सांगून त्यांच्या राहण्याची इतरत्र सोय करणार का?, की धोकादायक इमारतींना फक्त नोटीस बजावून आपले हात झटकण्याचेच काम करणार हे पाहणे गरजेचे आहे.