पादचारी पुलाच्या वाटेत पार्किंग
By Admin | Updated: February 1, 2017 03:15 IST2017-02-01T03:15:06+5:302017-02-01T03:15:06+5:30
पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकातील मध्यभागी असलेला पादचारी पूल रेल्वेने दहा वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून बांधला. मात्र या पूलावरुन पूर्व व पश्चिमेकडे उतरण्याची वाट

पादचारी पुलाच्या वाटेत पार्किंग
- राजू काळे, भार्इंदर
पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकातील मध्यभागी असलेला पादचारी पूल रेल्वेने दहा वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून बांधला. मात्र या पूलावरुन पूर्व व पश्चिमेकडे उतरण्याची वाट रेल्वेनेच बंद केली आहे. दुचाकींच्या पार्किंगमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
दुचाकी वाहनतळामुळे प्रवाशांना वाट काढताना जिकरीचे ठरत आहे. त्यातच उत्तर दिशेला असलेल्या पादचारी पुलावर जाण्याची वाट अरुंद असून त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. शिवाय याच मार्गावरुन दुचाकी ये-जा करतात. मध्यभागी बांधण्यात आलेल्या प्रशस्त पुलाच्या पायऱ्यांजवळच दुचाकीसाठी वाहनतळ सुरु केल्याने रेल्वे प्रशासनाचा उतारा कुचकामी ठरणारा आहे.
रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच सुविधा तोकड्या पडत असताना तसेच पुरेशी जागा नसतानाही वाहनतळ सुरु केल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. याउलट ज्या ठिकाणी रेल्वेची वाहनतळासाठी जागा होती, त्या जागेवर एका खाजगी विकासकाला इमारत बांधण्याची परवानगी दिल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी न्यायालयात दावा सादर केला आहे. रेल्वेच्या या भ्रष्ट कारभारामुळे प्रवाशांच्या संतापात भर पडत असून त्याचा केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता आहे. या वाहनतळ परिसरात पुरेसा उजेड नसल्याने रात्रीच्यावेळी महिला व तरुणींना येथून जाताना असुरक्षित वाटते. आर्थिक तडजोडीतून फेरीवाले बसत असल्याने त्यांना हटवण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असली तरी कारवाईसाठी एकमेकांकडे बोट दाखवली जात आहे.
या प्रकरणी रेल्वे प्रशासनाशी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. यंदा मात्र तेथील वाहनतळ विना रहदारीच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे.
- देवेंद्र पोरवाल, रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष
हा पूल प्रशस्त असल्याने त्याचा वापर ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांकडून केला जातो. परंतु, पूलाच्या उतरण्याच्या वाटेतच वाहने उभी केली जात असल्याने ये-जा करणे अडचणीचे ठरते. - संपत मोरे, प्रवासी
या पुलाच्या वाटेत उभी करण्यात येणारी वाहने त्वरित हटवून तेथे सुरक्षारक्षक तैनात करावा. तसेच रात्रीच्यावेळी तेथे पुरेशा दिव्यांची व्यवस्था करण्यात यावी.
- शालिनी अडसुळे, प्रवासी