Park inaugurates twice in five months | पाच महिन्यांमध्ये एकाच उद्यानाचे दोनदा लोकार्पण, आधी भाजपा आता शिवसेना करणार उदघाटन
पाच महिन्यांमध्ये एकाच उद्यानाचे दोनदा लोकार्पण, आधी भाजपा आता शिवसेना करणार उदघाटन

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर साकारण्यात आलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पाच महिन्यांत दुसऱ्यांदा केला जाणार आहे. आधी भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या उद्यानाचे लोकार्पण केले होते. आता शिवसेनेचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पाच महिन्यांत या उद्यानाचे नाव बदलण्याचा डावही शिवसेनेने आखला असून, दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या नावाऐवजी आता वनस्थळी उद्यान असे नामकरण केले जाणार आहे. याच मुद्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. हा राज्यमंत्र्यांचा अवमान असून याविरोधात लोकार्पणाच्या दिवशी आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मानपाडा, टिकुजिनीवाडी येथील पायथ्याशी निसर्ग परिचय केंद्र आहे. या परिचय केंद्राजवळ ठाणे मनपाचा आरक्षित सुविधा भूखंड आहे. ४५११.७४ चौ.मी. क्षेत्रफळाच्या या भूखंडावर निसर्ग उद्यान साकारावे यासाठी स्थानिक नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ८ मार्च २०१९ रोजी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजप गटनेते नारायण पवार, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, मुकेश मोकाशी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. या निसर्ग उद्यानात विविध विभाग करण्यात आले आहे. मेडीटेशन, फिटनेस, मुलांसाठी खास प्ले विभाग, ओपन जिम असे विविध विभाग असून त्यात जिमचे साहित्य, लहान मुलांच्या खेळण्यांचे साहित्य ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, या उद्यानाचे लोकार्पण होऊन पाच महिने होत नाही तोच आता याच उद्यानाचे लोकार्पण आदीत्य ठाकरे यांच्या हस्ते १५ आॅगस्ट रोजी सांयकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे. यापूर्वी या उद्यानाचे नाव स्व. वसंत डावखरे उद्यान असे ठेवण्यात आले होते. कधी काळी शिवसेनेशी जवळीक असलेल्या डावखरेंचे नाव शिवसेनेने हटवले आहे. आता पालिकेने छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत या उद्यानाचे नामकरण करुन वनस्थळी उद्यान असे ठेवण्यात आले आहे. याविरोधात भाजपने आवाज उठवला असून, हा राज्यमंत्र्यांचा अवमान असल्याचे मत नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेने लोकार्पण रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. एकूणच या मुद्यावर शिवसेना विरुध्द भाजप असा वाद पुन्हा उफाळला असून, त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

आधीचे उदघाटन अनौपचारिक होते - मीनाक्षी शिंदे
महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, या उद्यानाचे यापूर्वी अनौपचारिक उद्घाटन झाले होते. वास्तविक पाहता, पालिकेचे उद्यान असल्याने नियमानुसार पालिकेची निमंत्रण पत्रिका त्यावेळेस छापण्यात आली नव्हती. मात्र आता या उद्यानाचे औपचारीकरित्या उद्घाटन केले जात आहे. शिवाय नामकरणाचा कोणताही ठराव यापूर्वी झालेला नाही. त्यामुळे हा वादाचा विषय होऊ शकत नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

 


Web Title: Park inaugurates twice in five months
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.