शिक्षकांना नव्हे, पालकांना हवी वॉटरबेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:12 AM2020-01-23T00:12:50+5:302020-01-23T00:13:19+5:30

आधी शाळेतील स्वच्छतागृहाकडे लक्ष द्या, शिक्षणतज्ज्ञांनी दिला सल्ला

parents wants Waterballs, not to teachers | शिक्षकांना नव्हे, पालकांना हवी वॉटरबेल

शिक्षकांना नव्हे, पालकांना हवी वॉटरबेल

googlenewsNext

- प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेत तीन वेळा वॉटरबेल वाजविण्याचे परिपत्रक शासनाने मंगळवारी काढले. मात्र, याबाबत शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असली, तरी पालकांना वॉटरबेल ही गरजेची वाटत असल्याच्या प्रतिक्रिया ठाण्यातून उमटत आहेत. तर, शिक्षणतज्ज्ञांनी मात्र वॉटरबेल गरजेची असली, तरी शाळेतील स्वच्छतागृहांकडे आधी लक्ष द्यावे. कारण, तिचे थेट कनेक्शन स्वच्छतागृहाशी जोडले जात असल्याचे म्हटले आहे.

शाळेत आधीच दोन छोट्या सुट्या आणि मधली सुटी असल्याने तसेच प्रत्येक तासिकेनंतर पाणी पिण्याची विद्यार्थ्यांना मुभा असल्याने वॉटरबेलची गरज नाही, असे मत शाळेने व्यक्त केले आहे, तर मुलांना शाळेपासूनच पाणी पिण्याची सवय लागल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहील, असे पालकांचे म्हणणे आहे.

केरळमधील एका शाळेत सगळ्यात आधी वॉटरबेलच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या धर्तीवर पुणे, दिल्ली, बंगळुरू येथेही हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत आवश्यक तेवढे पाणी प्यावे आणि त्यासाठी त्याची आठवण व्हावी, यासाठी तीन वेळा पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाण्याची वॉटरबेल वाजविण्यात येणार आहे. परंतु, या वॉटरबेलला शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक यांनी गरज नसल्याचे सांगितले आहे. मात्र, ही खरोखर गरज असल्याचे पालकांचे मत आहे.

वॉटरबेल या संकल्पनेची सुरुवात खरेतर केरळमधून झाली. मुलांनी दोन लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. शाळेत ते सहा तास असतात. त्यात त्यांनी किमान अर्धा लीटर तरी पाणी पिणे गरजेचे आहे. परंतु, प्रश्न असा की, बेल वाजवून मुले पाणी पितील का? शाळेतले पाणी पिण्यालायक आहे की नाही, याची खात्री विद्यार्थ्यांना नसते. खासकरून, मुली तर पाणी प्यायला दुर्लक्ष करतात. कारण, त्यांना बाथरूमला जावे लागते. त्यात शाळेतले स्वच्छतागृह चांगले नसल्याने तेथे जाण्यास टाळाटाळ करतात. पाण्याची बेल वाजवून उपयोग नाही, त्याचे थेट कनेक्शन हे स्वच्छतागृहाशी निगडित आहे. शासनाने दिलेले आदेश योग्य असले, तरी वॉटरबेल हा अर्धा भाग आहे. खरा मुख्य भाग हा स्वच्छतागृह आहे.
- सुरेंद्र दिघे,
शिक्षणतज्ज्ञ

हल्ली जे आजार वाढलेत, त्याला कमी प्रमाणात पाणी पिणे हे कारणीभूत आहे. लहानपणापासून मुलांना पाणी पिण्याची सवय लावली, तर त्यांच्या शरीराची चांगली जडणघडण होईल. परंतु, वॉटरबेल वाजल्यावर पाणी पिणे, ही जबाबदारी शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांची जास्त आहे.
- किरण नाकती, संचालक,
माझी शाळा उपक्रम

विद्यार्थ्यांना मधल्या सुटीबरोबर १० मिनिटांच्या दोन छोट्या सुट्या असतात. त्यात ते पाणी पिऊ शकतात, बाथरूमलाही जाऊ शकतात. त्यामुळे वेगळ्या वॉटरबेलची गरज नाही. उलट, मुलांनी पाणी का प्यावे, याविषयी जागृती झाली तर वॉटरबेलची गरज लागणार नाही. वॉटरबेलची सवय लावण्यापेक्षा मुलांना पाणी का प्यावे, याचे महत्त्व पटवून द्यावे.
- नूतन बांदेकर,
शिक्षिका, ठामपा

वॉटरबेल म्हणजे जबरदस्तीने पाणी पाजल्यासारखे होते. मुलांना जेव्हा तहान लागते, तेव्हा ते पाणी पितात. तीन तासिकेनंतर पाणी पिण्यासाठी आणि बाथरूमला जाण्यासाठी १० मिनिटांच्या दोन छोट्या सुट्या आणि डबा खाण्यासाठी २५ मिनिटांची सुटी दिली जाते. मुलांच्या दप्तरातच पाण्याची बॉटल असल्याने तास संपल्यावर ते पाणी पितात. त्यामुळे वॉटरबेलची
गरज नाही.
- प्रकाश पांचाळ, मुख्याध्यापक,
डॉ. बेडेकर विद्यामंदिर

वॉटरबेलची गरज नाही, कारण मुलांकडे पाण्याची बॉटल असते. एक तासिका संपल्यावर दुसरी तासिका सुरू होईपर्यंत त्या तीनचार मिनिटांच्या कालावधीत मुले पाणी पिऊ शकतात. खरेतर, पाणी पिण्याची सवय पालकांनीच लावायला हवी. वॉटरबेलमुळे संपूर्ण शाळा डिस्टर्ब होईल, त्यामुळे याची गरज वाटत नाही.
- चंद्रकांत घोडके, मुख्याध्यापक, शिवसमर्थ विद्यालय

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वॉटरबेल हा चांगला प्रयोग राबवला जात आहे. हल्लीची मुले जंकफूड जास्त खातात. याचा परिणाम त्यांच्या तारुण्यातील फिटनेसवर होतो. मानसशास्त्रानुसार एखादी सवय रुळायला २१ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ही सवय शाळेपासूनच लावली तर त्यांचे आरोग्य चांगले राहील. मुले शालेत पाणी पितात, घरी नाही, असे व्हायला नको. उन्हाळ्यात पालकांनी याकडे जास्त लक्ष द्यावे.
- सीमा शेख देसाई, पालक, ठाणे

Web Title: parents wants Waterballs, not to teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.