गुटखा, सिगारेट, ऑनलाइन जुगारची जाहिरात करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याची विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतली शपथ
By नितीन पंडित | Updated: February 12, 2024 16:56 IST2024-02-12T16:56:29+5:302024-02-12T16:56:59+5:30
गुटखा सिगरेट यांच्या प्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी असली तरी अप्रत्यक्षपणे त्याची जाहिरात करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जातात.

गुटखा, सिगारेट, ऑनलाइन जुगारची जाहिरात करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याची विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतली शपथ
नितीन पंडित
भिवंडी : गुटखा सिगरेट यांच्या प्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी असली तरी अप्रत्यक्षपणे त्याची जाहिरात करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जातात. त्यामुळे अशा जाहिराती सर्रासपणे टिव्ही वर सुरू असतात.चित्रपट अभिनेते हे गुटखा सिगारेट यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून युवा वर्गाला आकर्षित करीत असतानाच मोबाईल वरील ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती अनेक खेळाडू करीत आहेत. त्याकडे युवावर्ग मोठ्या संख्येने आकर्षित होऊन जुगार व नशेच्या विळख्यात अडकत आहेत.युवा वर्गाला या पासून परावृत्त करण्यासाठी भिवंडी तालुक्यातील पडघा येथील तुळशीराम पाटील इंग्लिश मिडीयम शाळेच्या रौप्य महोत्सवी स्नेह संमेलनात संस्थाध्यक्ष कुंदन पाटील यांनी विद्यार्थी,पालक,शाळेतील शिक्षक यांनी कार्यक्रमा दरम्यान गुटखा सिगारेट यांचे सेवन करणार नाही तसेच ऑनलाईन जुगार खेळणार नाही अशी शपथ घेतानाच अशा वस्तूंची जाहिरात करणाऱ्या चित्रपट अभिनेते यांचे चित्रपट पाहणार नाही तर ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणाऱ्या खेळाडूंचा खेळही पाहणार नाही अशी शपथ घेतली.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी शशिकांत तांबोळी,अविनाश महाजन,शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्याच्या युगात गुटखा सिगारेट यांच्या व्यसनाचे प्रमाण वाढले असताना,मोबाईल वरील ऑनलाईन जुगार खेळल्याने अनेक युवक भरकटले गेले आहेत.अनेक युवकांनी जुगारात पैसे हरल्याने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत तर अनेक जण त्यामुळे चोरीच्या मार्गाला लागले आहेत.हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे.त्यामुळे शाळेचा रौप्य महोत्सव साजरा करताना शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या विरोधात अशा जाहिराती करणारे अभिनेते यांचे चित्रपट व खेळाडू यांचे कार्यक्रम न पाहण्याची शपथ घेतली असून त्यातून काही प्रमाणात का होईना आम्ही यशस्वी झालो तर हा उपक्रम सार्थकी लागेल अशी प्रतिक्रिया कुंदन पाटील यांनी दिली आहे.संस्थेच्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थित पालक विद्यार्थ्यांसह सर्वांनी स्वागत करीत प्रतिसाद दिला आहे.तसेच सध्या हि शपथ तालुक्यात चर्चेचा विषय बनली असून या निर्णयाचा सर्वच स्थरातून स्वागत करण्यात येत आहे.