पप्पू कलानी समर्थकांचा आयलानींच्या घरासमोर ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:00 AM2019-09-16T00:00:37+5:302019-09-16T00:00:58+5:30

टाउन हॉल येथे शनिवारी झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात माजी आमदार पप्पू कलानी यांचा दहशतवादी असा उल्लेख झाला.

Pappu Kalani's supporters meet in front of the Ilani's house | पप्पू कलानी समर्थकांचा आयलानींच्या घरासमोर ठिय्या

पप्पू कलानी समर्थकांचा आयलानींच्या घरासमोर ठिय्या

googlenewsNext

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : टाउन हॉल येथे शनिवारी झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात माजी आमदार पप्पू कलानी यांचा दहशतवादी असा उल्लेख झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने या प्रकाराने संतप्त झालेल्या शेकडो कलानी समर्थकांनी रविवारी जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच मध्यवर्ती पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कुमार आयलानी व राम वाधवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी कलानी समर्थकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
कलानी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा ओमी कलानी, कमलेश निकम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, पितू राजवानी यांच्यासह शेकडो कलानी समर्थकांनी निषेध व्यक्त केला. तसेच दुपारी आयलानी यांच्या घरासमोर एकत्र येत ठिय्या दिला. आयलानी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी आयलानी यांच्या घरासह पक्ष कार्यालयाला पोलीस संरक्षण दिले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काही कलानी सकर्थकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.
सलग चार वेळा आमदारपदी निवडून आलेले कलानी यांना दहशतवादी म्हणणारे वाधवा व आयलानी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन ओमी टीमचे संतोष पांडे यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिले. या प्रकाराने आयलानी-कलानी आमनेसामने आले असून राजकीय वातावरण तापले आहे. वाधवा यांच्यावर तीन दिवसांत कारवाई केली नाहीतर चेहऱ्याला काळे फासण्याचा इशाराही समर्थकांनी दिला आहे.
दरम्यान, शनिवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत एकेकाळी कट्टर कलानी समर्थक असलेले माजी उपमहापौर विनोद तलरेजा, माजी नगरसेवक गणपत ऐडके, पृथ्वी वलेच्छा, व्यापारी संघटनेचे नरेश दुर्गांनी, पप्पू बहरानी यांच्यासह अनेकांना प्रवेश दिला.
>चौकशीनंतर कारवाई करण्याचे आश्वासन
ओमी टीमच्या निवेदनावरून कारवाई करण्याचे संकेत मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी दिले. कलानी समर्थकांनी ठिय्या केल्यावर ताब्यात घेतल्याचे सुराडकर यांनी सांगितले. तर, झालेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो, असे कुमार आयलानी यांनी सांगितले.

Web Title: Pappu Kalani's supporters meet in front of the Ilani's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.