पप्पू कलानी हे शरद पवारांचे खरे पाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 06:22 IST2019-01-14T06:22:24+5:302019-01-14T06:22:31+5:30
गणेश नाईक यांचे प्रतिपादन : उल्हासनगरात राष्ट्रवादीचा परिवर्तन मेळावा

पप्पू कलानी हे शरद पवारांचे खरे पाईक
- सदानंद नाईक
उल्हासनगर : पप्पू कलानी हे पक्षाचे नेते शरद पवार यांचे खरे पाईक असून कलानी कुटुंब पवार विचारधारेचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री गणेश नाईक यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन मेळाव्यात केले.
उल्हासनगरात राष्ट्रवादी निर्धार परिवर्तन मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. मेळाव्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, गणेश नाईक, संजीव नाईक, प्रमोद हिंदुराव आदी नेते उपस्थित होते. बहुतांश नेत्यांनी त्यांच्या भाषणातून मोदी सरकारवर टीका केली. छगन भुजबळ यांनी, पंतप्रधान मोदी जुमलेदार झाल्याचे सांगून अच्छे दिन आनेवाले है, या वाक्यावर आता हशा पिकत असल्याचे सांगितले.
गणेश नाईक यांनी आ. ज्योती कलानी यांच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांचा मुलगा ओमी आणि सून पंचम भाजपाच्या वाटेवर गेले असले, तरी ते स्वत: पक्षाचे नेते शरद पवार यांच्या विचारधारेचे असल्याचे सांगितले. पप्पू कलानी हे शरद पवार यांचे पक्के पाईक असल्याचे सांगतानाच, नाईक यांनी ज्योती कलानी यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन यावेळी केले.
कलानी महलवर मेजवानी
परिवर्तन मेळावा आटोपल्यानंतर जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, गणेश नाईक, चित्रा वाघ यांच्यासह इतर नेत्यांना पप्पू कलानी यांच्या कलानी-महलवर मेजवानी देण्यात आली होती. तत्पूर्वी मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. अच्छे दिन आनेवाले है... या मोदी सरकारच्या जुमल्यावर आजकाल हशा पिकतो, असे ते यावेळी म्हणाले. इतर नेत्यांनीही यावेळी मोदी सरकारवर टीका केली.