पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 08:08 IST2025-11-08T08:08:17+5:302025-11-08T08:08:48+5:30
पंतप्रधानांनी माझ्या पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे, पत्नी मंजुळा यांची आर्त मागणी

पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
हितेंन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: गुजरात राज्यातील ओखा पोरबंदर येथील नल नारायण ह्या ट्रॉलर्सना समुद्रात मासेमारी करताना पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केल्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले आहे. या ट्रॉलरमध्ये सातपाटी येथील मच्छीमार नामदेव बाळकृष्ण मेहर यांच्यासह अन्य मच्छीमारांचा समावेश आहे. काही वर्षापूर्वी मेहेर यांच्या जावयाचा पाकिस्तानी सैनिकांनी ट्रोलर्सचा पाठलाग करताना केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गुरुवारी या घटनेबाबत मेहेर कुटुंबीयांना कळविण्यात आल्याने हे संपूर्ण कुटुंबीय दडपणाखाली आले असून पंतप्रधानांनी माझ्या पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची विनंती त्यांची पत्नी मंजुळा हिने केली आहे.
सातपाटी येथून गुजरात राज्यातील ओखा-पोरबंदर येथील ट्रोलर्सवर खलाशी कामगार म्हणून कामावर गेलेल्या नामदेव बाळकृष्ण मेहेर (वय ६५ वर्ष) यांच्यासह जिल्ह्यातील सातपाटी, डहाणू, तलासरी तालुक्यातील अनेक मच्छीमार चांगल्या पगाराच्या मोबदल्यात गुजरात राज्यातील ओखा, पोरबंदर, वेरावल भागातील बोटींवर खलाशी कामगार म्हणून कामावर जातात. या बोटी मासेमारी करताना पाकिस्तान हद्दीत गेल्यास त्यांना पाकिस्तानच्या मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीकडून ताब्यात घेऊन पाकिस्तान तुरुंगात डांबले जाते. आजही १९३ मच्छिमार कैदी पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याची माहिती इंडिया-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी या संस्थेचे माजी पदाधिकारी जतीन देसाई यांनी 'लोकमत'ला दिली. १९३ पैकी अनेक लोकांच्या शिक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही त्यांची सुटका होत नसल्याने भारत सरकारकडून त्यांच्या सुटकेची प्रयत्न व्हावेत, अशी मागणी त्यांच्या कुटुंबाकडून केली जात आहे.
गुजरात राज्यातील जलपरी या बोटीवर पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे (वय ३२ वर्ष) या वडराई मधील मच्छीमार तरुणांचा चार जागीच मृत्यू झाला होता. समुद्रात भारत - पाकिस्तान हद्दीचे कुठलेही मार्किंग केलेले नसताना चुकून मासेमारी करताना भारत-पाकिस्तान हद्द ओलांडल्यावर पाकिस्तान सैनिकाने सरळ गोळीबार करण्याच्या प्रकरणाचा जतीन देसाई यांनी निषेध नोंदवला होता. याच श्रीधर चामरे यांचे सासरे नामदेव मेहेर हे गुजरातमधील नल नारायण या जयंतीभाई राठोड यांच्या ट्रॉलर्सवर काम करण्यासाठी गेले होते. मेहेर हे मागील ३० वर्षापासून गुजरातमध्ये मासेमारीसाठी जात असून ६५ वय पूर्ण झाल्याने आमच्या वडिलांची ही शेवटची खेप होती, असे माहिती त्यांचा मुलगा कांचन मेहेर यांनी 'लोकमत' सांगितले.
नामदेव मेहेर सह सुतार पाड्यातील अन्य एक व्यक्तीना अटक करण्यात आली असून ते पालघर जिल्ह्यातील आहेत की अन्य जिल्ह्यातील याची माहिती अजूनही मिळू शकलेली नाही. मागच्या आठवड्यात नल नारायण ही ट्रॉलर्स समुद्रात मासेमारीसाठी गेली असताना पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केल्याच्या आरोपावरून तीन ट्रॉलर्सना पाकिस्तानी सैनिकांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलल्याची माहिती जतीन देसाई यांनी 'लोकमत'ला दिली.