मुरबे बंदरातून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या जय श्री साई या मासेमारी करणाऱ्या बोटीला वेगाने आलेल्या एका मालवाहू बोटीने जोरात धडक दिल्याची घटना घडली. मोठ्या बोटीने दिलेली धडक इतकी जोरात होती की, मासेमारी करणाऱ्या बोटीतील चार मच्छिमार समुद्रात फेकले गेले. या घटनेत मच्छीमार बोटीचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मासेमारी हंगाम सुरू झाला असून, मुरबे येथील जय श्री साई ही बोट समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. 14 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता या बोटीतील 15 मच्छिमार खलाशांनी सर्व जाळी समुद्रात टाकली.
समुद्रात २०:००:२६८/७१:१८:१५६ E नॉटिकल क्षेत्रात जाळी टाकल्यानंतर समुद्रात अँकर टाकून आणि बोटीवरील सिग्नल लाईट चालू करून काही मच्छीमार झोपी गेले. तर बोटीचा तांडेल आपल्या सहकाऱ्यांसह समुद्रात टाकलेल्या जाळ्यांवर लक्ष ठेवून होता.
मालवाहू जहाजाने जोरात दिली धडक
९.३० वाजण्याच्या सुमारास बोटीच्या समोरून एक मोठे मालवाहू जहाज येत असल्याचे तांडेल यांना दिसले. त्यांनी बोटीवरील सर्व लाइट्स सुरू केले आणि जहाजाने दिशा बदलावी म्हणून ओरडू लागले. पण, वेगाने आलेल्या या मालवाहू जहाजाने जय श्री साई बोटीला समोरून जोरात धडक दिली.
या धडकेमुळे बोटीमध्ये असलेले चार मच्छीमार समुद्रात फेकले गेले. सर्वत्र अंधार असल्याने हे मच्छिमार समुद्रातील प्रवाहाने वाहून जाऊ लागले. त्याच वेळी बोटीतील तांडेल यांनी आपल्या वायरलेस सेटवरून मुरबे येथील साईप्रिया बोटीचे मालक जितेंद्र राजेंद्र तरे यांच्याशी संपर्क केला आणि मदत मागितली.
जितेंद्र तरे आणि शांताराम ठाकरे यांनी तात्काळ आपल्या बोटी घेऊन अपघातग्रस्त जय श्री साई बोटीला गाठले. यावेळी बोटीचा पुढचा भाग अपघातग्रस्त झाल्याने समुद्राचे पाणी वेगाने बोटीत शिरत होते.
बोटीत शिरणारे पाणी रोखण्याचे प्रयत्न
मदतीसाठी आलेल्या दोन्ही बोटी आणि जयश्री साई बोटीतील मच्छिमारांनी हाताला मिळेल त्या वस्तूच्या सहाय्याने समुद्राचे येणारे पाणी रोखून धरण्याचे प्रयत्न सुरू केले. तर दुसरीकडे समुद्रात पडलेल्या चार खुलाशांनाही वाचवले.
समुद्रात वादळी वारे वाहत असल्याने मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. त्यामुळे मदतीसाठी आलेल्या दोन्ही बोटींना दोरखंडाच्या साह्याने जय श्री साई बोटीला बांधून शुक्रवारी ३.३० वाजता सुखरूप पणे मुरबे बंदरात आणून सोडले.
या अपघातात जय श्री साई बोटीचे मोठे नुकसान झाले असून, ही बोट पुन्हा मासेमारीला जाण्याच्या क्षमतेची राहिलेली नसल्याचे मुरब्याचे उपसरपंच राकेश तरे यांनी लोकमतला सांगितले.